९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज मंगळवारी वर्धा येथे पार पाडली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज मंगळवारी वर्धा येथे पार पाडली. या बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. ते सध्‍या गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडमध्‍ये कार्यरत असून नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.

96 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिनांक ३,४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होत आहे. या साहित्य संमेलनाच्‍या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनी स्‍वीकारली असून संरक्षपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी सांभाळली आहे. या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी हे आहेत

विदर्भ साहित्य संघाचे या वर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवले होते. साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला दिले.या संमेलनाचे उद्घाटन ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. त्यापूर्वी महामंडळाचे ध्वजारोहण करण्यात येईल. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन २ फेब्रुवारीला पूर्वाध्यक्षांच्या डॉ. भारत सासणे यांच्‍या हस्ते होणार असून यात साधारणत: ३०० गाळे राहणार आहेत. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडीने 3 तारखेला सकाळी ८.३० वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाचा समारोप ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता होईल, अशी माहिती प्रा. उषा तांबे यांनी दिली.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com