Sanjay Raut
Sanjay Raut

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ

संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीय, राऊत सासवडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

नरेंद्र मोदी म्हणतात, उद्धव ठाकरेंनी औरंगजेबासारखा काँग्रेसचा हात पकडला आहे. नरेंद्र मोदी तुम्ही स्वत: औरंगजेब आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झालाय. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. गुजरातमध्ये मोदींचं गाव आहे. त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. त्या गावात औरंगजेबाचा जन्म झाल्याने मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय. म्हणून ते वारंवार महाराष्ट्रावर आक्रमण करायला येतात. जे महाराष्ट्रावर चाल करुन येतात. तो कुणीही असूद्या, त्याचा मान महाराष्ट्र राखणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. राऊत सासवडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

संजय राऊत जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, पुरंदरच्या तहानंतरच अब्जल खान आणि औरंगजेब गाडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात २७ वेळा आले. रोज बघावा तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात असतात. मुंबईत आठ सभा घेणार आहेत. आख्खा देश त्यांनी वाऱ्यावर सोडला आणि ते महाराष्ट्रात येतात. कारण महाराष्ट्राची त्यांना भीती वाटते. हा महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उधळून टाकेल, अशाप्रकारची भीती त्यांना वाटत असल्याने नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सातत्याने येतात.

गेल्या दहा वर्षांपासून देशाचे पंतप्रधान रोज खोटं बोलत आहेत. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नव्हता. इतकं खोटं बोलतात की, देशाला दिलेली आश्वासने, वचनांचा विसर त्यांना पडला आहे. महाराष्ट्र गिळायचा, महाराष्ट्राचं नेतृत्व संपवायचं, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा, मुंबई लुटायची, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सर्व लूट गुजरातला न्यायची. अशाप्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गेल्या काही वर्षांपासून चालवलं आहे.

नरेंद्र मोदी असे औरंगजेबासारखे का वागतात, आम्ही तुमची तुतारी बरोबर वाजवणार आहोत. आमची संपूर्ण शिवसेना सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे. बारामतीची लढाई शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची नाहीय. बारामतीची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. कुणीतरी ऐरेगैरे गुजरातमधून बारामतीत येणार आणि आमच्या पराभवासाठी ठाण मांडून बसणार. अजितदादांची चंपा (चंद्रकांत पाटील) लाडकी आहे.

आले किती, गेले किती संपले भरारा पण शरद पवारांच्या नावाचा अजूनही आहे दरारा..तुम्ही काय आम्हाला आणि उद्धव ठाकरेंना संपवणार, याआधी बाळासाहेब ठाकरेंना संपवायला निघाले होते, काँग्रेसमुक्त भारत करणार होते, काँग्रेसला संपवायला निघाले होते, ही ऐतिहासिक निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहिल की हुकूमशाही? या देशात चोरांचं राज्य राहिल की लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहिल, हे आपण ठरवायला पाहिजे.

अजित पवार गावागावातील लोकांना, लहान व्यापाऱ्यांना जाहीरपणे धमक्या देतात. उद्योजकांना सांगतात, माझं काम कर नाहीतर बघून घेईल, पण तुम्ही काय बघून घेणार, ४ जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. कार्यकर्त्यांना बोलवून त्यांना नोटिसा द्यायच्या आणि ५० कोटी, २० कोटींचा दंड ठोठावायचा. दंड रद्द करायचा असेल, दंड कमी करायचा असेल, तर आमच्याकडे या. याला लोकशाही म्हणतात का?

हिंमत असेल तर मैदानात उतरा आणि निवडणूक लढा, मग जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते कळेल. तुमच्या धमक्यांना घाबरणारी महाराष्ट्राची जनता नाही. धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही. त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं. हे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी एव्हढा आत्मविश्वास असेल, तर धमक्या देऊन निवडणुका लढवू नका. सभेला आलेल्या लोकांनी तुमच्या धमक्यांना भीख घातली नाही, असंही राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com