पंतप्रधान मोदी–झेलेन्स्की चर्चा, युद्ध थांबवून शांततेसाठी भारताचा पुढाकार
रशिया–युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. या चर्चेत युक्रेनमधील विद्यमान परिस्थिती, युद्धाचे परिणाम आणि त्यावर तोडगा काढण्याच्या शक्यता याबाबत सविस्तर चर्चा झाली. मोदींनी भारत नेहमीच संघर्षाचा शांततापूर्ण मार्ग शोधण्याच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले.
मोदींनी लवकरात लवकर युद्ध संपवून स्थिरता व शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आवश्यक त्या सर्व पावले उचलण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच, या उद्दिष्टासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढवण्याचा निर्धारही व्यक्त केला.
द्विपक्षीय सहकार्यावर भर
संवादादरम्यान भारत–युक्रेन यांच्यातील द्विपक्षीय भागीदारी, व्यापार आणि परस्पर हिताच्या विषयांवर सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी पुढेही नियमित संपर्कात राहण्याचे ठरवले.
ट्रम्प–पुतिन बैठकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 15 ऑगस्टला होणारी बैठक लक्षात घेता मोदी–झेलेन्स्की यांची चर्चा विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या संवादातून दोन्ही देशांनी युद्ध संपविण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांना गती देण्याचे संकेत दिले.
झेलेन्स्की यांनी चर्चेनंतर सांगितले की, मोदी यांनी युक्रेनच्या जनतेसाठी व्यक्त केलेले समर्थन आणि सकारात्मक संदेशाबद्दल ते आभारी आहेत. तसेच, रशियन ऊर्जा विशेषतः तेल निर्यातीवर निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.