Naresh Mhaske On Uddhav Thackeray: "अरे अरे अरे... काय तुमची किंमत?" दिल्लीतील फोटोवरून उद्धव ठाकरेंवर टीकेचा वर्षाव
दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी 7 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते. बैठकीदरम्यान मतदारांच्या गोंधळ आणि निवडणूक आयोगासंबंधी मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी सादरीकरण केलं. या बैठकीतील काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसते. यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टीकेची मालिका सुरू केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते केशव उपाध्ये यांनी, “हिंदुत्व आणि विचारधारा सोडली की मिळतं काय?… शेवटची रांग!” असा थेट सवाल केला.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसन्मान व स्वाभिमान शिकवला, अपमानाविरुद्ध लढण्याचा धडा दिला, पण उद्धव ठाकरे यांनी त्यातून काहीही घेतलेलं नाही. काँग्रेसच्या बैठकीत त्यांना आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं, तर एकेक खासदार असलेल्या पक्षांना पुढच्या रांगेत जागा मिळाली.
म्हस्के यांच्या पोस्टमधील शब्द असे “आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे... #शिवरायांचा वारसा सांगता ना रे... काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे???? #बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?? #काँग्रेस ने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे.... तुमच्यापेक्षा एकेक खासदार वाले पक्ष बरे. त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे. #महाराष्ट्राची #दिल्ली त जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे... थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे. महाराष्ट्राची किंमत #कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे.....” राजकीय वर्तुळात या फोटोंवरून सुरू झालेली ही टीका आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.