Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अधिकृत तारखा जाहीर; यंदाच्या 'त्रिखंडी मेळ्या'ला होणार पुढच्या वर्षी सुरूवात

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अधिकृत तारखा जाहीर; यंदाच्या 'त्रिखंडी मेळ्या'ला होणार पुढच्या वर्षी सुरूवात

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अधिकृत तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अधिकृत तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज, रविवारी महत्त्वाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजन संदर्भात साधू महंत यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख प्रत्येकी दोन साधू, महंत उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कुंभमेळ्याच्या तारखांवर चर्चेअंती शिक्कामोर्तब करण्यात आला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदाच्या कुंभमेळ्याला त्रिखंडी कुंभमेळा असे नाव देण्यात आले आहे.

बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडमवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्या संदर्भातील 13 प्रमुख आखाडे आहेत. त्याचे महंत, साधूसंत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाची मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली. यात कशाप्रकारे पुढची कारवाई करायची याबाबत चर्चा झाली. सर्व आखाड्यांच म्हणणं आम्ही ऐकून घेतलं. त्यासोबतच आतापर्यंत सरकारने काय कारवाई केली हीदेखील त्यांना सांगितली. जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4 हजार कोटी रुपयांचे विविध कामाच्या निविदा या काढल्या आहेत. त्यातील काही अंतिम टप्प्यात आहेत. आणखी 2 हजार कोटी रुपयांच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत."

नाशिक कुंभमेळा अमृतस्नान

ध्वजारोहण - 31 ऑक्टोबर 2026 रोजी (कुंभ पर्वाला सुरुवात)

पहिले अमृतस्नान - 2 ऑगस्ट 2027

द्वितीय अमृतस्नान - 31 ऑगस्ट 2027

तृतीय अमृतस्नान - 11 सप्टेंबर 2027

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अमृतस्नान

ध्वजारोहण - 31 ऑक्टोबर 2026 रोजी (कुंभ पर्वाला सुरुवात)

पहिले अमृतस्नान - 2 ऑगस्ट 2027

द्वितीय अमृतस्नान - 31 ऑगस्ट 2027

तृतीय अमृतस्नान - 11 सप्टेंबर 2027

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com