नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...
नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी साद घातली आहे. अमित ठाकरे यांनी नाशिकच्या पूर्व मतदार संघातून उमेदवारी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
नाशिकच्या प्रसाद सानप यांनी हे पत्र अमित ठाकरेंना लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपले पक्षनेते यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण संपविण्यासाठी व महाराष्ट्रातील जनतेला नवनिर्माणाचा आश्वासक चेहरा देण्यासाठी मी सुध्दा निवडणूक लढायला तयार असल्याचे वक्तव्य आपण केल्याचे प्रसार माध्यमांतून पहायला व वाचायला मिळाले.
त्यानुसार आमचा आपल्याला आग्रह आहे की, आपण नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी करावी. आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक जीवाचे रान करू व पुन्हा आपला बालेकिल्ला काबिज करु. मा. राजसाहेब यांच्या विचारांचा पगडा या मतदारसंघावर आहे. सद्यस्थितीतील महाराष्ट्राचे राजकारण, नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी हे गंभीर प्रश्न आहेत. नाशिक शहराला कोणीच वाली नसल्याची परिस्थिती आहे.
नाशिक सारख्या शहरात पाण्याचे व रस्त्याचे प्रश्न बिकट झाले आहेत. माय माऊलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत पंचवटीकर व नाशिकरोड मधील नागरिक आपल्याकडे आशेने बघत आहेत. नाशिकपूर्व विधानसभा मतदारसंघात चाळीशीच्या आतील मतदारांची संख्या ४५ टक्क्यापेक्षा जास्त आहे. आम्ही सर्व सहकाऱ्यांनी निर्धार यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. मतदारांशी संवाद साधत त्यांचे विविध प्रश्न सोडविले आहेत. बहुसंख्य आपल्या विचारांच्या मतदारांची नोंदणी केलेली आहे. सभासद नोंदणीच्या माध्यमातून नवीन युवकांची, महिला व ज्येष्ठांची फळी आपल्या पक्षासोबत जोडली गेली आहे. निष्ठावंत महाराष्ट्रसैनिक जे प्रवाहातुन बाहेर गेले होते ते पुन्हा संघटनेत नव्याने सक्रिय झाले आहेत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात 331 बुध येतात. त्यापैकी सर्वच बुथवर प्रत्येकी दहा व त्यापेक्षा अधिक महाराष्ट्रसैनिकांची तुकडी सज्ज आहे. या मतदारसंघात आपले वर्चस्व याआधी राहिले आहे. येथे माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस श्री. अशोकभाऊ मुर्तडक हे वास्तव्यास आहेत. तसेच कडवट महाराष्ट्रसैनिकांची फौज तयार आहे. आपण जर या मतदार संघातून निवडणूक लढवली तर मी व्यक्तिशः प्रसाद सानप व आम्ही सर्व महाराष्ट्रसैनिक निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी घेवू. या मतदार संघात आपणाला केवळ उमेदवारी अर्ज भरायला व विजयाचे पत्र स्विकारायला यावे लागेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. असे पत्रात लिहिलं आहे.