Shirdi Saibaba Temple : शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातील नियमांमध्ये बदल, नवीन नियम लागू
शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आता लांबच लांब रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही. शिर्डी संस्थानाने ब्रेक दर्शनाची व्यवस्था केल्यामुळे आता सर्वसामान्य भक्तांना शिर्डीच्या साईबाबांचे लवकरात लवकर दर्शन घेणे शक्य होणार आहे. साई संस्थानाच्या समितीने हा नवीन नियम जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी त्वरित करणार असल्याची माहिती त्या संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक दररोज येत असतात. मात्र या भाविकांना दिवसभर लांबचलांब रांगांमध्ये उभे राहावे लागते. याशिवाय साई संस्थानाच्या प्रशासकीय यंत्रणेवरही याचा मोठा भर येतो. यातून मार्ग काढण्यासाठी "ब्रेकदर्शन" ची नवी सुविधा व्हीआयपी भाविकांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये नवीन नियमानुसार व्हीआयपी दर्शनासाठी असणाऱ्या भाविकांसाठी वेळ मर्यादा देण्यात आली आहे.
दिवसातून तीन वेळेलाच या भक्तांना दर्शन घेण्यास मिळणार आहे. व्हीआयपी भक्तांना सकाळी ९ ते १०, दुपारी २.३० ते ३.३० आणि रात्री ८ ते ८.३० या वेळेमध्येच दर्शन घेता येणार आहे. मात्र या काळात सामान्य भक्तांच्या दर्शनाची रांग ही सुरु ठेवण्यात येणार असल्याने सामान्य भाविकांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही. त्याचबरोबर व्हीव्हीआयपी आणि दान देणाऱ्या भक्तांसाठी वेळेचे बंधन असणार नाही. त्यांच्यासाठी वेगळ्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
या ब्रेकदर्शनच्या सुविधेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आता शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे साई संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे ही सोप्पे होणार आहे.