Israel Gaza Conflict : गाझा पट्टीत आता हाॅस्पिटलवरही भीषण हल्ला! इस्त्रायलच्या हल्ल्यांत 15 पेक्षा जास्त जणांसह पत्रकारही ठार

Israel Gaza Conflict : गाझा पट्टीत आता हाॅस्पिटलवरही भीषण हल्ला! इस्त्रायलच्या हल्ल्यांत 15 पेक्षा जास्त जणांसह पत्रकारही ठार

गाझा पट्टीत इस्त्रायल-हमास संघर्ष अधिक तीव्र झाला असून नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यात नासेर रुग्णालयावर लक्ष्य साधण्यात आले.
Published by :
Team Lokshahi
Published on

गाझा पट्टीत इस्त्रायल-हमास संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यात नासेर रुग्णालयावर लक्ष्य साधण्यात आले. या हल्ल्यात किमान 15 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून त्यात पत्रकार आणि मदत कर्मचारी यांचा समावेश आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहिल्या हल्ल्यानंतर बचाव पथके व स्थानिक लोक तेथे पोहोचले, मात्र त्याचवेळी पुन्हा एक हल्ला झाला.

मृतांमध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमांशी संबंधित तीन पत्रकार आहेत. यात रायटर्सचे कॅमेरामन हुसाम अल-मस्री, अल-जझीराचे मोहम्मद सलामा आणि एनबीसीचे मुआझ अबू ताहा यांचा समावेश आहे. स्वतंत्र पत्रकार मरियम अबू दक्का हेसुद्धा या हल्ल्यात बळी पडल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हुसाम अल-मस्री यांचा कॅमेऱ्यावरचा थेट प्रक्षेपण हल्ल्याच्या क्षणी अचानक थांबला होता. या घटनेवर अद्याप इस्त्रायली सरकार किंवा लष्कराने अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

दरम्यान, गाझा पट्टीत सुरू असलेल्या नाकेबंदीमुळे लोकांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अन्नधान्य, औषधे व इंधनाचा तुटवडा असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रुग्णालये उद्ध्वस्त झाल्याने आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषतः मुलांवर उपासमारी आणि कुपोषणाचा मोठा परिणाम होत आहे.

संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने युद्धविरामाची मागणी केली आहे. मात्र सततचे हल्ले आणि वाढत जाणारे मृत्यू पाहता परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. गाझातील मानवी संकट दिवसेंदिवस उग्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com