Sunil Tatkare On Rohit Pawar : "भाजपचा व्हायरस तुमच्याही पक्षाला लागलाय" रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल; तटकरेंच प्रत्युत्तर काय?

Sunil Tatkare On Rohit Pawar : "भाजपचा व्हायरस तुमच्याही पक्षाला लागलाय" रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल; तटकरेंच प्रत्युत्तर काय?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "अजित दादांचा पक्ष कोकणातील एका नेत्यानं हायजॅक केलेला आहे. भाजपचा व्हायरस आधी आमच्या पक्षाला लागला, त्यातून एक गट फुटला. आता हा व्हायरस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला फोडतोय," असा दावा त्यांनी केला.

रोहित पवार पालघर दौऱ्यावर बोलत होते. त्यांनी सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण यांच्या नियुक्ती प्रकरणाचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केला – "तटकरे साहेब म्हणतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सुरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय घेतला. मग अजित दादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का? ज्या नेत्याने पक्ष वेगळा केला, साहेबांची साथ सोडली आणि आमदारांना निवडून आणलं, त्याच नेत्याला जर पक्षात वेगळं केलं जात असेल, तर यावरून स्पष्ट होतं की भाजपचा व्हायरस आता त्यांच्या गटातही घुसलाय."

रोहित पवारांनी यावेळी भाजपवर थेट आरोप करत म्हटलं, "भाजपचा डाव स्पष्ट आहे – आधी आमचा पक्ष तोडला, आता अजित पवारांचा गट आणि शिंदे यांचा पक्ष फोडण्याची तयारी सुरू आहे. कोकणातल्या एका नेत्याकडे अजित पवारांचा पक्ष ‘हायजॅक’ झालाय."

रोहित पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ इच्छित नाही. आमचे मुख्य प्रवक्ते आनंद परस्पे यांनी कालच त्यांना ट्विटरवर उत्तर दिलं आहे. ‘आपलं स्वतःचं घर सांभाळा आणि मग दुसऱ्याकडे लक्ष द्या’. इतरांच्या घरात डोकावण्याची गरज नाही," असे तटकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, "आम्ही आज 41 जागांवर निवडून आलेलो सक्षमपणे आहोत. तुम्ही आधी तुमचं राजकीय घर नीट बघा आणि मग इतरांवर भाष्य करा."

रोहित पवारांच्या आरोपांनंतर आणि सुनील तटकरे यांच्या प्रत्युत्तरानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजपवर ‘व्हायरस’सारखा पक्ष फोडण्याचा आरोप आणि अजित पवार गटाच्या अंतर्गत नेत्यांवर ‘हायजॅक’चा टोमणा या दोन्ही मुद्द्यांवर पुढील काही दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच रंगण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचा थेट परिणाम पक्षांतर्गत समीकरणांवर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com