Supriya Sule on Maharashtra Election
Supriya Sule on Maharashtra ElectionSupriya Sule on Maharashtra Election

Supriya Sule on Maharashtra Election : 'घोळ दूर करुन ...', सुप्रिया सुळे यांची मागणी

महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

  • पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर निवडक धोरणे राबवल्याचा आरोप केला.

  • सरकार महाराष्ट्रात नाव बदलण्याचे राजकारण करत आहे. “जर हे धोरण योग्य असेल तर कश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्र करा.

महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर निवडक धोरणे राबवल्याचा आरोप केला. सुळे म्हणाल्या की, सरकार महाराष्ट्रात नाव बदलण्याचे राजकारण करत आहे. “जर हे धोरण योग्य असेल तर कश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्र करा. महाराष्ट्रावरच प्रेम का? उद्या महाराष्ट्राचे नाव बदलतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी, बेरोजगारी व महागाईवर थेट टीका

महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटातून जात असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला. “राज्यात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. ऊस उत्पादक शेतकरी नाराज, कांदा-सोयाबीन शेतकऱ्यांना भाव नाही. दिवाळीपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण काहीच मिळाले नाही. दोन-तीन रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणेतील हत्याकांड आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न

पुण्यातील दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाचा संदर्भ देत त्यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “क्राईम वाढला, बेरोजगारी-महागाई वाढली. ही केवळ आरोप नाहीत; डेटा केंद्र सरकारचाच आहे,” असे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीतील अनियमितता; निवडणूक आयोगावर प्रश्न

राहुल गांधी यांनी दिलेल्या मतदार यादीतील अनियमिततेच्या कथित पुराव्यांचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या, “मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. एका मुलीचं नाव आहे जी देशात राहतच नाही पण वोटिंग झालंय. हे गंभीर आहे. निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे. घोळ दूर न करता निवडणुका घेण्यात अर्थ नाही.”

विशेष अधिवेशनाची मागणी

राज्यातील स्थिती गंभीर असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी, अर्थव्यवस्था आणि गुन्हेगारी विषयांवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. “विरोधात असलो तरी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ. ऑपरेशन सिंधूर्सारखी एकता आता महाराष्ट्रासाठी गरजेची आहे,” असे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळ नामांतरावर भूमिका

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा मुद्दा उपस्थित करत सुळेंनी सांगितले की, भावना स्थानिकांची आहेत. “महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव स्पष्टपणे पाठवावा आणि केंद्राने तातडी निर्णय घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

सुप्रिया सुळे यांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत राज्यातील वास्तव चिंताजनक असल्याचे सांगितले. “आम्ही आरोप करत नाही, वास्तव मांडत आहोत. महाराष्ट्र आर्थिक-सामाजिक अडचणीत आहे,” असे निष्कर्ष त्यांनी मांडले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com