CM Devendra Fadnavis : "विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि...चौथी मुंबई" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज संपन्न झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या शहरी विकासासाठी महत्त्वपूर्ण अशी घोषणा करत “चौथी मुंबई” उभारण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री म्हणाले, “नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित होणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी डोंगरासारखे उभे आहेत. त्यामुळे राज्य आता थांबणार नाही, पुढेच जाणार आहे.”
फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाचं वर्णन “इंजिनिअरिंग मार्बल” असं करत या प्रकल्पासाठी डोंगर तोडावे लागले, नदीचा प्रवाह बदलावा लागला, तरीही पर्यावरणपूरक रचना उभी राहिल्याचं सांगितलं. “हा एअरपोर्ट फक्त विमानतळ नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचं नवं प्रवेशद्वार आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या जीडीपीत एक टक्का वाढ होईल,” असं ते म्हणाले.
नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विमानतळ परिसरात वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू होणार असून, प्रवाशांना थेट गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास करता येईल. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मेट्रो-3 लाईनच्या अंतिम टप्प्याचाही उल्लेख केला. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा हा टप्पा सुरू झाल्याने आता गोरेगाव आरे ते कफ परेड असा अखंड प्रवास मुंबईकरांना शक्य झाला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर व जलद होणार आहे.
वाढवण परिसरात उभारण्यात येणारी “चौथी मुंबई” ही केवळ शहरी संकल्पना नसून महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि सागरी विकासाला चालना देणारा नवा अध्याय ठरणार आहे. नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि आता वाढवण या चार शहरांच्या संगतीत राज्याच्या प्रगतीला नवा वेग मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.