Nawab Malik : मतदानाच्या शाईवरून गदारोळ, नवाब मलिकांनी दिलं स्पष्ट उत्तर
मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवरून सुरू झालेल्या वादाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. शाई पुसली जाते आणि बनावट मतदान होते, हे आरोप त्यांनी साफ फेटाळून लावले आहेत.
मलिक म्हणाले की, आता मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित झाली आहे. आधी शाई काडीने लावली जायची, मात्र सध्या मार्करचा वापर होत असून ती सहज निघत नाही. शिवाय, मतदार यादीत प्रत्येक मतदाराचा फोटो असल्यामुळे पुन्हा पुन्हा मतदान करणे शक्यच नाही.
विरोधकांवर टीका करत त्यांनी सांगितले की, काही नेते मुद्दाम संभ्रम निर्माण करत आहेत. एखाद्या मंत्र्यालाच स्वतःचा मतदान केंद्र सापडत नसेल, तर त्यांच्या पक्षाची तयारी किती तोकडी आहे, हे यातून दिसते.
शेवटी त्यांनी मुंबईकरांना आवाहन केले की, लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर घराबाहेर पडा आणि नक्की मतदान करा. कमी मतदान झाल्यास शहराचा कारभार चुकीच्या हातात जाण्याची भीती असल्याचेही त्यांनी नमूद केले.

