Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar On Ajit Pawar

"गेले तर गेले...आपण नवीन नेते तयार करू", बारामतीच्या सभेत अजित पवारांवर निशाणा, शरद पवार म्हणाले...

लोकांच्या परिवर्तनासाठी 'तुतारी' वाजवायची आहे, शरद पवारांचं बारामतीच्या सभेत कार्यकर्त्यांना आवाहन
Published by :

लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवण्यासाठी आणि फुटलेल्या पक्षाला पुन्हा बळकटी देण्यासाठी शरद पवार यांनी बारामतीच्या सभेत तुतारी फुंकली. यावेळी पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. पक्ष, घड्याळ या दोन्हींची चोरी झाली. होलसेल चोरी झाली. राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला, हे संपूर्ण देशाला माहित आहे. ज्यांनी पक्ष नेला, त्यांनी मतदान कोणाच्या नावाने मागितलं. गेले तर गेले..आपण नवीन नेते तयार करू. अनेकांना आमदार खासदार केलं..केंद्रात मंत्री केलं..आपल्या घरात चोरी झाली तर आपण घर चालवणे बंद करतो का ? लोकांच्या परिवर्तनासाठी ही तुतारी वाजवायची आहे, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. ते बारामतीच्या सभेत बोलत होते.

शरद पवार जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, ज्या देशात घटनेच्या अधिकाराची पायमल्ली केली जाते, त्या देशात हुकूमशाही लागू केली जाते. देशात जर घटनेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान किती वेळा आले? ते ३० दिवसांमध्ये फक्त एकदा सभागृहात आले. पंतप्रधानांचा संसदीय लोकशाहीवर किती विश्वास आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. देशाची घटना बदलण्याचं काम भाजप करीत आहे. यामुळे लोकशाही संकटात आलेली आहे. १९५८ साली मी दहावी पास झालो. बारामतीत कॉलेज नसल्यामुळे मला पुण्यात अॅडमिशन घ्यावं लागलं. बारामती हे पुण्यानंतर शैक्षणिक हब बनलं आहे. काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला आहे.

पण आपल्या इथे ही गोष्ट मी होऊ दिली नाही. आपला भाग दुष्काळी असल्याने पाणी कमी आहे. मात्र, जिरायती भागात पाण्याविना शेती करता येत नाही. मुली शिकल्या की घर सुधारतं. केवळ मुलं शिकून उपयोग नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीत कोणालाही भूमिका घेण्याचा अधिकार आहे. राजकारणात लोकांना दिलेला शब्द पाळला पाहिजे. दुर्दैवाने देशात जे घडत आहेत. वेगळं राजकारण सुरू आहे. सत्ताही लोकांच्या भल्यासाठी, मात्र आज सत्ता लोकांना दाबण्यासाठी वापरली जाते.

लीकरबद्दल जे धोरण आखलं त्यामुळे केजरीवाल जेलमध्ये आहेत. देशातील सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची तब्बल ७० हजार कोटींची कर्जमाफी माझ्या काळात करण्यात आली. पैसे वसूल करण्याची गॅरंटी मोदींची आहे. हा प्रकार देशाच्या हिताचा नाही. त्यामुळे देशातील जनतेला बदल पाहिजे. युनियन काढली म्हणून नोकरीवरून काढून टाकणं, हे योग्य नाही आणि बारामतीत हे चालणार नाही. कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे लवकरच आपण बारामतीमध्ये उभं करू, असंही शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com