NCP Crisis :राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत सुनावणी संपली; युक्तिवादादरम्यान जोरदार खडाजंगी

NCP Crisis :राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत सुनावणी संपली; युक्तिवादादरम्यान जोरदार खडाजंगी

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? यासंदर्भात दिल्लीत निवडणूक आयोगासमोर आजची सुनावणी संपली आहे. या सुनावणीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते.
Published by  :
shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? यासंदर्भात दिल्लीत निवडणूक आयोगासमोर आजची सुनावणी संपली आहे. या सुनावणीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते. २४ नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने खोटी प्रतिज्ञापत्र दिल्याचा दावा करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली. या वेळी युक्तिवादादरम्यान दोन्ही गटांत जोरदार खडाजंगी झाली.

आजच्या सुनावणीत शरद पवारांच्या बाजूने वकील अभिषेक मनू सिंघवी आणि वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी अभिषेक मनू सिंगवी हे एका तासापासून फक्त एफिडेव्हिटबद्दल बोलत आहेत, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, असे म्हणत मुकुल रोहतगी यांनी त्यांचा मुद्दा खोडून काढला.

यानंतर शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आयोगासमोर महत्त्वाचा मुद्दा मांडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे शरद पवारांना देण्यात यावे, यासाठी अजित पवारांच्या वतीने प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्या सोबतच त्या प्रस्तावावर अजित पवारांची स्वाक्षरी असून, गेल्या दहा महिन्यांपासून अजित पवार हे शांत होते. मात्र, त्यांना जेव्हा वेगळं व्हायचं होतं, तेव्हा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, असे देवदत्त कामत यांनी आयोगाला सांगितले.

तसेच अजित पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही देवदत्त कामत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रीय अधिवेशन यासंदर्भात अजित पवार गटाच्या वतीने संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्हाबाबतची सुरू असलेली आजची सुनावणी संपली असून, पुढची सुनावणी आता 24 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com