Rohit Pawar : महाराष्ट्रात राजकीय भूकंप? सत्तासंघर्षावर रोहित पवारांनी केलं सूचक ट्वीट, म्हणाले...

Rohit Pawar : महाराष्ट्रात राजकीय भूकंप? सत्तासंघर्षावर रोहित पवारांनी केलं सूचक ट्वीट, म्हणाले...

राज्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सत्तेचा संघर्ष सुरू आहे

राज्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सत्तेचा संघर्ष सुरू आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे गटाचे १६ आमदार पात्र की अपात्र? अशा अनेक गोष्टींवरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या." असे रोहीत पवार ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

यासोबतच पुढे रोहीत पवार यांनी सवाल उपस्थित केला आहे की, या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती.. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं.. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं… ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत? असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सलग २ दिवसांपासून सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरू आहे. आज तिसरा दिवस ही सुनावणी होणार आहे. यावर काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com