राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार; महसूल विभागाकडून एसआयटीची स्थापना

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार; महसूल विभागाकडून एसआयटीची स्थापना

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी त पुन्हा वाढ होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

चेतन ननावरे, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी त पुन्हा वाढ होणार आहेत. कारण नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करताना अनियमितता झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता.

तसेच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्यानुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक होत असताना राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मात्र अडचणीत येताना दिसत आहेत.

काय आहे प्रकरण?

- हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाशिकच्या सातोड प्रकरणात तब्बल ४०० कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा सनसनाटी आरोप केला होता.

- या प्रकरणात जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिल्याचे पाटील यांनी म्हटले होते.

- यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता.

- यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे पाटील यांचे म्हणणे होते.

- या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

- या मागणीनुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केली आहे.

- विभागीय आयुक्तांना एसआयटीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्याचे अधिकार असतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com