राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची हकालपट्टी
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे देखील उपस्थित होते. या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये ही मागणी केली होती. त्यानंतर शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार यांचं ट्विट
मी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे पक्षविरोधी कारवायांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाच्या सदस्स नोंदणातून काढून टाकण्याचे आदेश देत आहे.
सुप्रिया सुळे यांचं पत्र
खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या संसदेतील दोन खासदारांनी पक्षविरोधी कारवाई करत 2 जुलै रोजी झालेल्या शपथविधीला उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर या दोन्ही खासदारांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडत पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. या दोन खासदारांनी आणि पक्षाच्या नऊ आमदारांनी पक्षाची कोणतीही संमती न घेता निर्णय घेतला आहे.
पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेवत, त्यांना कोणतीही कल्पना न देता या नेत्यांनी काही गोष्टी केल्या. त्यामुळे ते पक्षातून बडतर्फीस पात्र ठरतात. पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारल्याचं स्पष्ट झालं आहे.
स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे.
त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी विनंती.