Sharad Pawar NCP Group
Sharad Pawar NCP Group

शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर, बीड आणि भिवंडी लोकसभेसाठी दोन उमेदवार केले घोषित

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने दुसऱ्या यादीत दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने दुसऱ्या यादीत दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे असा सामना रंगणार आहे. भिवंडी लोकसभेसाठी बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी लोकशाहीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. "बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे असा सामना रंगणार आहे, यावर प्रतिक्रिया देताना सोनावणे म्हणाले, शरद पवार साहेब, जयंत पाटील आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन दुसऱ्यांदा बीड लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ही हाय वोल्टेज निवणडूक नाही. एकतर्फी निवडणूक आहे. बजरंग सोनावणे यावेळी खासदार होणार. बीड जिल्ह्यात न राहणाऱ्या उमेदवाराचं आव्हान काय असणार, असं म्हणत सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला.

तसंच भिवंडीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले, भिवंडीकरांना अपेक्षित असा हा निर्णय आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याचं आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मी आभार मानतो. माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेल. भिवंडीकरांना अपेक्षित असं काम पुढील पाच वर्षात करून दाखवेल. गेल्या दहा वर्षात भिवंडीचा विकास झालेला नाही. संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं विकासकाम झालं नाही. त्यामुळे येथील मतदारांची मविआकडून खूप मोठी अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com