NCP Vardhapan Din : पुण्यात NCP चा वर्धापन दिन दोन वेगवेगळ्या गटांकडून होणार स्वतंत्ररीत्या साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या दोन्ही गटांकडून 10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन स्वतंत्ररीत्या वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरात या दोन्ही गटांच्या कार्यक्रमांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन सोहळा 10 जून रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या मेळाव्यात शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही महत्त्वाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचा वर्धापन दिन मेळावा 10 जून रोजी दुपारी 1 वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अजित पवार कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांकडून कोणती राजकीय रणनीती जाहीर होते, कोणती नवी दिशा दिली जाते आणि पक्षकार्यकर्त्यांना काय संदेश दिला जातो, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे.