PM Narendra Modi : बिहार निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा
थोडक्यात
बिहार निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर जोरदार निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केले. त्यांनी सुरुवातीला म्हटले की बिहारने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की “झूठ नेहमी हारतो आणि जनतेचा विश्वास जिंकतो.” जमानतवर बाहेर असलेल्या नेत्यांना जनता साथ देणार नाही, असा स्पष्ट संदेश या निकालातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारने एनडीएवर दाखवलेला विश्वास हे लोकशाहीवरील अढळ श्रद्धेचे दर्शन असल्याचे ते म्हणाले.
मोदींनी आपल्या भाषणात ‘MY फॉर्म्युला’चा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. काही पक्षांनी तुष्टिकरणावर आधारित MY मुस्लिम-यादव फॉर्म्युला उभा केला होता, पण बिहारच्या 2025 निवडणुकीने महिला आणि युवा असा नवीन ‘MY’ फॉर्म्युला स्वीकारला आहे, असे त्यांनी सांगितले. बिहारात सर्वाधिक तरुणांची संख्या असून ते सर्व धर्म-जातीतून येणारे आहेत; त्यांच्या आकांक्षा आणि उमेदमुळे जुना सांप्रदायिक फॉर्म्युला कोसळला, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की ही फक्त एनडीएची नाही, तर भारताच्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांचीही विजयगाथा आहे. पूर्वी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्मतदान होत असे, मतदानादरम्यान हिंसाचार घडत असे, पण यावेळी दोन्ही टप्प्यांत कुठेही पुनर्मतदानाची गरज पडली नाही. शांततेत आणि उत्साहात झालेले मतदान हे निवडणूक आयोगासाठी मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पूर्वी माओवादी-नक्सल दहशतीने त्रस्त असलेला बिहार आता पूर्णपणे बदलला असून रेकॉर्ड मतदान हे त्या बदलाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.
जंगलराज आणि कट्टा सरकारचा उल्लेख करत मोदी म्हणाले की बिहारची जनता अशा परिस्थितीला परत येऊ देणार नाही. “झूठ हारतो, जनविश्वास जिंकतो,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला. बिहारने विकसित आणि समृद्ध भविष्यासाठी मतदान केले आहे आणि 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिला आहे, असे ते म्हणाले. त्यांनी बिहारच्या जनतेचे आणि एनडीएतील सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.
मोदींनी छठपूजेलाही विशेष उल्लेख केला. छठ पूजा युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा हा जगाला ओळख करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. विकासविरोधकांना देखील मोदींनी खडे बोल सुनावले. बिहारला एक्सप्रेसवे, हायवे, उद्योग यांची गरज नाही असे म्हणणाऱ्यांना हा निकाल थेट उत्तर देतो, असे ते म्हणाले. वंशवाद आणि परिवारवादाच्या राजकारणाला बिहारने स्पष्टपणे नाकारून विकासवादाला मतदान केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
काँग्रेसवरही मोदींनी अतिशय तीव्र टीका केली. काँग्रेस ‘मुस्लिम-लीगी माओवादी काँग्रेस’ MMC बनली असल्याचा आरोप त्यांनी केला. नकारात्मक राजकारणामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष वाढत असून पुढे तिच्यात आणखी मोठी फूट पडू शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. छठ पूजेला ‘ड्रामा’ म्हणणाऱ्यांनी बिहारच्या संस्कृतीचा अपमान केला असल्याचे सांगत मोदी म्हणाले की आरजेडी आणि काँग्रेसने आजवर त्याबद्दल माफी मागितलेली नाही, आणि बिहारचे लोक ते विसरणार नाहीत.
शेवटी मोदी म्हणाले की काँग्रेस हा परजीवी पक्ष असून आपल्या सहयोगी पक्षांच्या वोटबँकवरच तो जगतो. त्यामुळे काँग्रेसच्या साथीदारांनी स्वतःच सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले. बिहारच्या निकालांनी राज्यातील राजकारणाची दिशा बदलली असून महिला-युवा आणि विकास यांच्याच आधारे पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
