उद्धव ठाकरेंवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी निलम गोऱ्हे घेणार पत्रकारपरिषद, दोन दिवसांत स्पष्ट करणार भूमिका
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच दिल्ली येथे पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांचे वक्तव्य मात्र अधिक चर्चेत राहिले आहे. निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्या खूपच वादात अडकल्या आहेत. सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसून आली. अखिल चित्रे, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे यांनीदेखील टीका केली. निलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराबाहेरदेखील ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केले.
त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीदेखील प्रतिक्रिया देत "आम्ही गद्दारांकडे लक्ष देत नाही"असे वक्तव्य केले. त्यानंतर शरद पवार यांनीदेखील निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून "निलम गोऱ्हे यांनी केलेले वक्तव्य मूर्खपणाचं" असं ते म्हणाले. मात्र आता या सगळ्यावर आता निलम गोऱ्हे स्वतः दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणार असल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान निलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपानंतर ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला बघायला मिळाला आहे.