Rohit Pawar On Gopichand Padalkar : “ ...फसवण्याचा प्रयत्न” पडळकरांचा कार्यकर्ता अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, रोहित पवारांचा गंभीर आरोप
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात शब्दयुद्ध रंगलं असून, आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट भाजपवर आणि विशेषत: पडळकरांच्या गटावर गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
शरणू हांडे असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव असून, तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. काल झालेल्या या घटनेत हांडे यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमित सुरवसे आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. सध्या हांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आज गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात भेट देऊन हांडे यांची विचारपूस केली आणि यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर थेट टीका केली.
रोहित पवार यांचे प्रत्युत्तर पत्रकार परिषद
पडळकरांच्या आरोपांनंतर लगेचच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. “शरणू हांडे आणि अमित सुरवसे हे दोघे जुने मित्र आहेत. मात्र, राजकीय मतभेदांमुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. 30 जून रोजी अमित सुरवसे याला फार भयानक पद्धतीनं मारहाण झाली होती. त्याचे व्हिडिओही लोकांसमोर आले होते. त्यावेळी त्याला खालच्या स्तरावर जाऊन बोललं गेलं आणि त्यामुळे तो मनातून फार दुखावला होता,” असं पवार यांनी सांगितलं.
त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “कालच्या घटनेला जर अमित सुरवसे जबाबदार असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच. पण त्याच्यावर कोणती कलमे लावली, हे पोलिसांनी स्पष्ट करायला हवं. तसेच 30 जूनला त्याला ज्या पद्धतीनं मारलं गेलं, त्याच पद्धतीची कारवाई शरणू हांडेवर होणार का?”
“मला फ्रेम करण्याचा प्रयत्न” – रोहित पवार
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत एक फोटो आणि व्हिडिओ दाखवत नवीन मुद्दा मांडला. “काल घटना घडल्यानंतर जेव्हा गोपीचंद पडळकर रुग्णालयात गेले, तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या माऊली हवणार नावाच्या भाजप कार्यकर्त्याने (जो किसान सेलचा पदाधिकारी आहे) हांडे यांच्या कानात काहीतरी सांगितलं. आणि लगेचच हांडे यांनी माझं नाव घेतलं. हा प्रकार पाहता मला मुद्दामहून या प्रकरणात फसवण्याचा डाव रचला जात आहे का, हा प्रश्न निर्माण होतो,” असा गंभीर आरोप पवार यांनी केला.
राजकीय रंग चढलेला वाद
या प्रकरणामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे पडळकरांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली, तर दुसरीकडे पवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिस तपासातून पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा खरा चेहरा उघड होण्याची शक्यता आहे.