Nitesh Rane VS Anil Parab : अनिल परब यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन नितेश राणे आक्रमक
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट बराच चर्चेत राहिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालताना दिसत आहे. मात्र आता याच चित्रपटाचा संदर्भ देत राज्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधानसभेच्या सभागृहात एक विधान केले. या विधानामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. "छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून औरंगजेबाने त्यांचा छळ केला आणि मी पक्ष बदलावा म्हणून छळ होत आहे." अनिल परब यांच्या या विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत केल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाने अनिल परब यांच्या या विधानावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
विधानपरिषदेचा आजचा सहावा दिवस आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यात विधान परिषदेत जोरदार वाद झाला. गुरुवारी अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहात गोंधळ घातला. अनिल परबांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. या दरम्यान सभागृहात नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादामुळे विधानपरिषदेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. सत्ताधाऱ्यांकडून तसेच विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या सर्व गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळा तहकूब करण्यात आले.