मी पण हिंदूंचा गब्बर, मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात' विरोधकांवर टीका करत नितेश राणेंचं विधान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला घडली. या घटनेमुळे संपुर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका टीपणी केली जात आहे. यातच आज या घटनेचा निषेधात महाविकास आघाडीकडून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येतं आहे. यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी 'छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करणारे हे लोक आहेत. आपटे याने केलेली चूक मान्य मात्र त्याने केलेल्या चुकीवर हे जोडे मारणार, मात्र पुणे हडपसर येथे एका पठाणने शिवरायांचा पुतळा तोडला तेव्हा यांच्यातला कोणीही बाहेर आलेला नाही' अस म्हणत टीकास्त्र डागलं आहे.
महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करणारे हे लोक आहेत. आपटे याने केलेली चूक मान्य मात्र त्याने केलेल्या चुकीवर हे जोडे मारणार मात्र पुणे हडपसर येथे एका पठाणने शिवरायांचा पुतळा तोडला तेव्हा यांच्यातला कोणीही बाहेर आलेला नाही. त्यामुळे आपटेला एक न्याय आणि पठाणला दुसरा न्याय असल्याने हे हिंदू द्वेशी आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
पुढे ते म्हणाले की, माझा इतिहास सर्वांना माहिती आहे दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबीय आहे. बाकी कोणाच्यात हिंमत नव्हती माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काऊंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे. हिमतीने सर्व करा कुणी काय इथे करू शकत नाही. आपल्या जिभेला हाड आहे का पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर मी जाऊन बोलतो मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले.
मालवण येथील घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ माफी मागून चालणार नाही हा महाराष्ट्र धर्माचा अवमान आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटले होते.यावर बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जेंव्हा मराठा क्रांती मोर्चा निघाला तेंव्हा याच उद्धव ठाकरेंच्या पेपरमध्ये मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे कार्टून छापण्यात आले होते त्यावेळी या उद्धव ठाकरेची माफी लोकांनी का स्वीकारली. त्या संजय राजाराम राऊतला ते कार्टून कुणी छापायला दिले होते. तेंव्हा उद्धव ठाकरेला जोडे का मारले नाहीत असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळ्याप्रकरणी श्रीकांत शिंदे यांचा आपटे हा मित्र असल्याने त्याला अटक होतं नसल्याचे आरोप महाविकास आघाडी कडून करण्यात आले. त्यावर राणेनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपटे हा कुठल्या जगाच्या पाठीवर जाऊन बसला असेल तर त्याला सोडणार नाही त्या आपटेला ना श्रीकांत शिंदे वाचविणार नां ही आणखीन कोण वाचविणार शिवारायांच्या पेक्षा मोठा कोणीचं नाही त्यामुळे तो कुठल्याही बिळात शोधून बसला असेल तर त्याला शोधून काढू फक्त शोधून काढणार नाही तर आपटणार अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे,