'मंकीपॉक्स' आजाराचा मुंबई महानगर क्षेत्रात एकही रूग्ण नाही, तथापि शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजना
दिलीप राठोड | मुंबई: पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित सेव्हन हिल्स रूग्णालयात 14 रूग्णशय्या असलेला कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन करण्यात येत आहे.
जगातील काही देशात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडूनदेखील ‘मंकीपॉक्स’ सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मंकीपॉक्स’ आजाराच्या प्रतिबंध आणि उपाययोजनांसाठी तयारी सुरू केली आहे. संसर्गजन्य आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी विशेष रूग्णालये असलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित सेव्हन हिल्स रूग्णालयात संभाव्य ‘मंकीपॉक्स’ रूग्णांसाठी आरक्षित कक्ष व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षामध्ये 14 रुग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याचीही रूग्णालय प्रशासनाने तयारी ठेवली आहे.
जगभरात विविध देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे आढळले आहे. परिणामी ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘मंकीपॉक्स’ संसर्गास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता 14 रूग्णशय्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रसंगी या रूग्णशय्यांची संख्या वाढवण्याची तयारीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने केली आहे. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणासोबत नियमितपणे समन्वय आणि संपर्क साधण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.
या अनुषंगाने ‘मंकीपॉक्स’ संदर्भात काल (दिनांक 21 ऑगस्ट 2024) विमानतळ आरोग्य अधिकारी (APHO), इमिग्रेशन अधिकारी, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची एकत्रित समन्वय सभा झाली. विमानतळ आरोग्य अधिकारी (APHO) विभागामार्फत ‘मंकीपॉक्स’ बाधित आफ्रिकन देशातून येणारे नागरिक तसेच इतर प्रवाश्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानतळ आरोग्य अधिकारी (APHO) कार्यालयामार्फत आरोग्य माहिती कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रवाशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ संशयित व्यक्ती आढळून आल्यास सदर व्यक्तीला महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात विलगीकरण तथा पुढील उपचाराकरिता पाठविण्यात येणार आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘मंकीपॉक्स’ रुग्णांकरिता एकूण १४ रूग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे विमानतळ आरोग्य अधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवण्यात येत आहे.
मंकीपॉक्स संसर्ग
मंकीपॉक्स संसर्ग हा ऑर्थोपॉक्स (orthopox) या डीएनएच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे दोन्ही प्राणी विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत.
रुग्णांचा संसर्गजन्य कालावधी
अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी 1 ते 2 दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांच्या खपल्या पडेपर्यंत किंवा पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रूग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.
मंकीपॉक्सचा प्रसार
- थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्रव
- अप्रत्यक्ष संपर्क, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत
- जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे
- बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.
लक्षणे / चिन्हे
- ताप
- लसीका ग्रंथी सूज
- डोकेदुखी, अंगदुखी
- थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला
कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या समुदायांमध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
मंकीपॉक्स सदृश्य इतर आजार
कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलीस, हात, पाय, मौखिक आजार इत्यादी.
रुग्णव्यवस्थापन आणि विलगीकरण
- मंकीपॉक्स रूग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक आहे. याठिकाणी स्वतंत्र वायूविजन व्यवस्था असावी.
- रूग्णाने तीन स्तर आधारीत मुखपट्टी (मास्क) घालणे गरजेचे आहे.
- रूग्णाने पुरळ फोड नीट झाकले जावे, यासाठी लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पँट वापराव्यात
- लक्षणानुसार उपचार घ्यावेत आणि शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे प्रमाण कायम राहील, याची दक्षता घ्यावी.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)