EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
थोडक्यात
ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
उमेदवारांचे नाव, क्रमांक आणि चिन्ह स्पष्ट दिसावे यासाठी फॉन्ट आकार 30 ठेवण्यात आला आहे
( EVM ) बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. यानुसार ईव्हीएमवर उमेदवारांचे फोटो आता रंगीत स्वरूपात छापले जाणार आहेत. याआधी हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट असायचे. उमेदवारांची ओळख मतदारांना अधिक स्पष्टपणे पटावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आयोगाच्या नियमानुसार, उमेदवाराच्या चेहऱ्याला छायाचित्रात 75 टक्के जागा मिळणार आहे.
ईव्हीएमसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅलेट पेपरच्या गुणवत्तेसाठी आयोगाने ठरावीक मापदंड निश्चित केला आहे. 70 GSMच्या गुलाबी रंगाच्या विशेष कागदावर हे बॅलेट पेपर छापले जाणार आहेत. उमेदवारांचे नाव, क्रमांक आणि चिन्ह स्पष्ट दिसावे यासाठी फॉन्ट आकार 30 ठेवण्यात आला आहे आणि तो ठळक (बोल्ड) असेल. यामुळे मतदारांना मतदानाची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, बहुतेक मतदारांना मतदानासाठी स्वतंत्र कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. बिहारमधील 2003 च्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या जवळपास 60 टक्के मतदारांना जन्मतारीख किंवा जन्मस्थान सिद्ध करण्यासाठी दस्तावेज दाखवावे लागणार नाहीत. त्यामुळे मतदारांना अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी आयोगाकडून हे नवे बदल लागू करण्यात आले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरू होणारे हे प्रयोग पुढील काळात देशभरात अमलात आणण्याची तयारी आहे. यामुळे भारतीय निवडणूक व्यवस्थेचा दर्जा आणखी उंचावेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.