Nariyali Bhat (Sweet Coconut Rice) : आता बनवा नारळी पौर्णिमा स्पेशल 'नारळीभात'
Nariyali Bhat (Sweet Coconut Rice) : नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे काही तासांवर येऊन ठेपले आहे. अशावेळी कुटूंब एकत्र येते. आता सगळे एकत्र येणार म्हणजे जेवणाचा बेतही एकदम खास बनवला जातो. जेवणांमध्ये काहीतरी गोड पदार्थ लागतोच. नारळी पौर्णिमेला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे नारळी भात. आता जाणून नारळी भाताची रेसिपी
नारळी भात रेसिपी
साहित्य
२ टेबलस्पून तूप
३ ते ४ लवंगा, २- ३ हिरव्या वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा
१ कप खोवलेलं नारळ
१ कप साखर
१ कप तांदूळ घेऊन शिजवलेला भात
१० ते १२ केशराच्या काड्या
अर्धी वाटी दूध
काजू- बदामचे काप आणि मनुका असा सुकामेवा अर्धा कप.
रेसिपी
सगळ्यात आधी कढईमध्ये २ टेबलस्पून तूप टाका. तूप गरम झालं की त्यात लवंगा, वेलची, दालचिनी टाकून ते परतून घ्या. हे पदार्थ परतून झाले की त्यात खोवलेलं नारळं टाका आणि ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. नंतर साखर टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात बदाम आणि काजूचे काप तसेच मनुका टाका. आता त्यात शिजवलेला भात टाका.
त्यावर केशराचं दूध घाला. १० ते १२ केशराच्या काड्या दुधात भिजवून हे दूध तयार करून घ्यावं. हलक्या हाताने सगळं मिश्रण हलवा. भाताची शितं मोडणार नाहीत, याची काळजी घ्या. कढईवर झाकण ठेवा, ५ ते ७ मिनिटे कमी गॅसवर वाफ येऊ द्या. मस्त सुगंधित, उत्तम चवीचा आणि मोकळा- मोकळा नारळी भात झाला तयार.