Laxman Hake : "सरकारला जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही..." ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतापले

Laxman Hake : "सरकारला जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही..." ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतापले

ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाकेंवर प्रत्येकवेळी हल्ला होत असल्यामुळे त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली तरीही त्यांना सुरक्षा न मिळाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

महाराष्ट्रातील ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हाके यांनी आजवर सहा ते सात वेळा हल्ल्यांचा सामना केला असून, प्रत्येकवेळी त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली तरीही त्यांना सुरक्षा न मिळाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

भगवानगडावर जात असतानाही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. "अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असताना आणि आम्ही पोलिसांना वेळोवेळी संरक्षणाची मागणी करत असतानाही, माझ्यासोबत एकही पोलीस तैनात नसतो. महाराष्ट्रात आमच्या आंदोलनावर बंदी आणली जाते, पोलिस आमच्या सोबत नसतात, हा सरळ अन्याय आहे," असे हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

या हल्ल्यामागे काही कट रचला गेला असल्याचा संशय हाके यांनी व्यक्त केला. माध्यम प्रतिनिधींनी "या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?" असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले काही आमदार बेजबाबदार विधानं करतात. आम्ही आंदोलक आहोत, आमच्या मागण्या उघडपणे मांडतो, पण सत्तेत असलेल्या लोकांनी जबाबदारीने बोलायला हवं. लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांमध्ये संयम असणं गरजेचं आहे. न्याय, हक्क आणि लोकशाही मार्गाने महाराष्ट्र सरकारला जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही आमचं ओबीसींचं आंदोलन उभा करू"

हाके यांच्यावर झालेल्या ताज्या हल्ल्यामुळे ओबीसी आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नेत्याला सुरक्षा न देणाऱ्या पोलीस प्रशासनावर आणि सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com