Ola Electric Scooter : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत लक्षणीय घट
गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी यंदाच्या रिपोर्टनुसार झपाट्याने कमी होत असल्याचे पाहायला मिळाले. मार्च २०२५ मध्ये आलेल्या सेल्स रिपोर्टनुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत ५६ टक्क्यांनी घट झाली असून यामुळे ग्राहकांनी ओला स्कूटरकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीने मात्र याला कागदोपत्री गोंधळ झाल्याने ही घट दिसत असल्याची सारवासारव केली आहे. तर दुसरीकडे बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटारसारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत मात्र १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ओला कंपनीने 'ही' कारणे केली पुढे
मार्च २०२५ मध्ये जाहीर झालेल्या सेल्स रिपोर्टनुसार २३,४३० ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५६ टक्क्यांनी विक्री कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीने यासंबंधीत काही कारणे दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या कंपनीने स्वतःच त्यांच्या वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे विक्रीच्या संख्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यापूर्वी हे काम थर्ड पार्टी सर्विस प्रोवाईडर्स करत होते. रोजमर्टा डिजिटल सर्विसेज प्रायव्हेट लिमिटेड आणि शिमनीत इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशा दोन कंपन्यांकडे हे काम सोपवण्यात आले होते. फेब्रुवारी पुन्हा एकदा या कंपन्यांना रजिस्ट्रेशनचे काम सोपवण्यात आले, ज्यामुळे रजिस्ट्रेशनच्या कामात गोंधळ झाला. त्यामुळे पोर्टलवर रजिस्ट्रेशनच्या आकड्यांमध्ये तफावत दिसून आली.
ओला इलेक्ट्रिकने उत्पादन वाढवले
कंपनीने फेब्रुवारी आणि मार्चमधील वाहन विक्रीचे रजिस्ट्रेशन नव्याने सुरू केले आहे. हे काम एप्रिलपर्यंत पूर्णत्वास येईल असे कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने जनरेशन ३ पोर्टफोलियोची विक्री करण्यास सुरूवात केली असून यासाठी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या नवीन वाहनांचे उत्पादन वाढवले आहे. आपल्या विक्रीची क्षमता आणि ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादासाठी एप्रिलमध्येही जास्तीत जास्त उत्पादन वाढवणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
बजाज कंपनीच्या स्कूटर विक्रीत ९३ टक्क्यांनी वाढ
दुसरीकडे बजाज कंपनीच्या स्कूटर विक्रीत यंदा ९३ टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्या महिन्यात कंपनीने ३४,८६३ युनिट्स इतकी विक्रीची नोंद केली आहे. तर टीव्हीएस मोटारने स्कूटरच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ केली असून गेल्या महिन्यात त्यांनी ३०,४५४ युनिट्स विक्रीची नोंद केली आहे. तसेच हीरो मोटोकाॅर्प आणि ग्रीव्स इलेक्ट्रिकच्या वाहनांचीही मागणी वाढत असल्याचे सांगितले जात आहे.