Eknath Khadase : शिंदेंच्या फोनबाबत खडसेंचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गौप्यस्फोट
महानगर पालिकांसाठी आज (दि.13) प्रचाराच्या तोफा थंडावणार असतानाच आता शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदेंनी फोन करून किती नगरसेवक फुटू शकतात असे विचारल्याचा मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवली आहे. प्रचाराच्या तोफा थंडवण्याच्या दिवशी खडसेंनी शिंदेंबाबत हा खुलासा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या एका सभेत एकनाथ खडसेंनी हा खुलासा केला आहे. खडसेंच्या या खुलाशानंतर आता भाजपसह इतर पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. टीव्ही9 या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
जळगाव संदर्भात काय करायचं?
प्रकाशित वृत्तानुसार, शिंदेंनी जळगाव संदर्भात काय करायचं असा प्रश्न करत किती नगरसेवक फुटू शकतात असे विचारले होते. त्यावर मी त्यांना तुम्ही पाकिटे पाठवा, तीस ते पस्तीस नगरसेवक हे फुटू शकतात. मात्र हा विषय कोणाला सांगू नका? गुलाबराव पाटलांना तर, मुळीच नाही. कारण, पाटील आणि सुरेश दादा जैन यांचं चांगलं सुत जमतं. हा सर्व प्रकार जळगावच्या महापालिकेच्या जागेसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकी वेळी झाल्याचे खडसेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिक निवडणुकांमध्ये फोडाफोडीच राजकारण झाल्याचे आता समोर आले आहे.
भाजप आता पहिल्यासारखी स्वच्छ प्रतिमेची राहिली नाही
यावेळी खडसेंनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, हे चोर उच्चक्यांचं सरकार असून, भाजपने जळगावमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिले आहे. भाजप आता पहिल्यासारखी स्वच्छ प्रतिमेची राहिलेली नसल्याचा हल्लाबोल खडसे यांनी माजी महापौरांवरून केली. शहरात भ्रष्टाचार बोकळल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. लाडक्या बहिणीला पैसे दिले. मात्र भाई हा कसाई निघाला. या सरकारने पंधराशे रुपये दिले मात्र, राज्यात महागाई वाढवली. या महापालिका निवडणुकीत सर्वत्र पैशांचे पाकीट वाटली जात आहे आणि ते पाकीटं भाजपकडून येत असल्याचाही दावा त्यांनी केला.
