Long Weekend नंतर मुंबईकरांचा परतीचा प्रवास ठरला वाहतूक कोडींचा, महामार्गावर वाहनांच्या रांगा

Long Weekend नंतर मुंबईकरांचा परतीचा प्रवास ठरला वाहतूक कोडींचा, महामार्गावर वाहनांच्या रांगा

वाहतूक कोंडी: सुट्टीनंतर मुंबईकरांचा परतीचा प्रवास ठरला जीवघेणा, महामार्गावर वाहनांची गर्दी.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Mumbai Goa Highway Traffic : सलग आलेल्या तीन सुट्ट्यांमुळे पर्यटक विविध ठिकाणी फिरायला गेले होते, मात्र या सुट्ट्या संपल्यानंतर मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांचा परतीचा प्रवास रविवारी अक्षरशः जीवघेणा ठरला. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव-इंदापूर परिसरात तब्बल चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवासी तासन्‌तास कोंडीत अडकून पडले आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

स्वातंत्र्य दिन, दहीहंडी, आणि रविवारची सुट्टी संपल्याने सकाळपासूनच परतीच्या प्रवासासाठी वाहनांची गर्दी उसळली. माणगाव रेल्वे स्थानक परिसरापासून मुगवली गावापर्यंतच्या अवघ्या चार किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहनधारकांना अनेक तासांचा वेळ लागत आहे. महामार्गावर एसटी बस, खासगी गाड्या, दुचाकी, तसेच मालवाहतूक करणारे ट्रक-टेम्पोंची प्रचंड गर्दी झाली आहे.

दरम्यान, जोरदार पावसामुळे रस्त्यांवर निसरडेपणा निर्माण झाला असून वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आधीच असलेल्या गर्दीला आणखी गती मिळाली आहे. काही ठिकाणी वाहनं आडवी-तिडवी उभी राहिल्याने कोंडीची तीव्रता वाढली आहे. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे, तसेच सिग्नलचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही उशिरापर्यंत कोंडी कायम असल्याने प्रवासी आणि वाहनधारकांची मोठी दमछाक झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com