PM Modi : डिजिटल इंडियाच्या दशकपूर्तीत पंतप्रधान मोदींचा गौरव; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या विकासाची गती
डिजिटल इंडिया मोहिमेच्या १० यशस्वी वर्षांचा टप्पा पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक लेख लिहून देशवासियांशी संवाद साधला आहे. या लेखातून त्यांनी या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीचा मागोवा घेतला असून, डिजिटल परिवर्तनामुळे भारताच्या विकासमार्गावर कसा वेग आला, याचे तपशीलवार चित्रण केले आहे. 2014 मध्ये डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात करताना अनेकांनी भारतीय नागरिक तंत्रज्ञान वापरू शकतील का, अशी शंका व्यक्त केली होती. मात्र, त्या काळातील अपुऱ्या इंटरनेट प्रवेश आणि कमी डिजिटल साक्षरतेच्या वातावरणातदेखील सरकारने जनतेवर विश्वास ठेवत तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे धोरण स्वीकारले. यामुळे तंत्रज्ञान हे फक्त काही वर्गापुरते मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आणि विषमता दूर करण्याचे साधन बनले.
आज भारतात 97 कोटींपेक्षा अधिक इंटरनेट कनेक्शन आहेत. सुमारे 42 लाख किलोमीटर लांब ऑप्टिकल फायबर केबलमुळे देशातील अतिदुर्गम भागांपर्यंतही इंटरनेट पोहोचले आहे. देशातील 5 जी सेवेचा विस्तार हे जगातील सर्वात वेगवान नेटवर्क रोलआउट मानले जात आहे. डिजिटल व्यवहारांची क्रांती घडवणाऱ्या यूपीआय प्रणालीद्वारे आज दरवर्षी 100 अब्जांहून अधिक व्यवहार होतात. भारत हे जगातील सगळ्यात मोठे डिजिटल व्यवहार करणारे राष्ट्र बनले आहे.
सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेमुळे आतापर्यंत 44 लाख कोटी नागरिकांच्या खात्यांमध्ये थेट पोहोचले आहेत. या पद्धतीमुळे ३.४८ लाख कोटींचा अपव्यय वाचवला गेला. त्याचबरोबर 'स्वामित्व' योजनेअंतर्गत 2.4 कोटीहून अधिक मालमत्ता पत्रके जारी झाली असून 6.47 लाख गावांचे नकाशे तयार झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, डिजिटल इंडिया ही केवळ शासकीय योजना राहिलेली नसून ती आता लोकांची चळवळ बनली आहे. खासगी क्षेत्र, स्टार्टअप्स, लघुउद्योजक, शेतकरी, विद्यार्थी, महिला – सर्वांनाच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होत आहेत. ओएनडीसी (ONDC) सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे देशभरातील कारागिर, उद्योजक थेट ग्राहकांशी जोडले गेले असून कोणत्याही दलालाशिवाय व्यवसाय विस्तारत आहे.
GeM (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) वर आज लाखो विक्रेते सरकारला थेट उत्पादने आणि सेवा पुरवत आहेत. यामुळे सरकारी खरेदीत पारदर्शकता आली असून लघुउद्योजकांना प्रचंड मोठा बाजार खुला झाला आहे. कोविन प्लॅटफॉर्मने जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली. डिझीलॉकर, आधार, पीएम-वाणी यांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आज जगभर अभ्यासल्या जात आहेत. भारताने G20 अध्यक्षीय कार्यकाळात ग्लोबल DPI रिपॉझिटरी आणि २५ दशलक्ष सामाजिक परिणाम निधीच्या माध्यमातून इतर राष्ट्रांनाही डिजिटल परिवर्तनासाठी मदतीचा हात दिला आहे.
भारत आज जगातील तीन सर्वोच्च स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक आहे. पंतप्रधानांनी ‘इंडिया AI मिशन’ अंतर्गत ३४,००० GPU जागतिक सर्वात स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. यामुळे भारत केवळ सर्वात परवडणारी इंटरनेट अर्थव्यवस्था न राहता, जगातील सर्वात परवडणारी संगणन सुविधा असलेला देश ठरला आहे. लेखाच्या शेवटी पंतप्रधान मोदी म्हणतात, की येणाऱ्या दशकात भारत केवळ डिजिटल प्रशासनामध्ये नाही, तर जागतिक डिजिटल नेतृत्वामध्ये झेप घेईल. ‘इंडिया फर्स्ट’ ते ‘इंडिया फॉर द वर्ल्ड’ या दिशेने भारत वाटचाल करत आहे. “तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण एकत्र येऊया, नवकल्पना घडवूया आणि समाजात बदल घडवूया,” अशा शब्दांत त्यांनी देशवासीयांना पुढील क्रांती घडवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे.