Uddhav Thackeray : "एकेकाळचं ठाणे शिवसैनिकांचं होतं, आज ते ..." उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल
Uddhav Thackeray On Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात जोरदार राजकीय हल्लाबोल केला. "एकेकाळचं ठाणे शिवसैनिकांचं होतं, आज ते कॉन्ट्रॅक्टर आणि भ्रष्टाचार्यांचं ठाणं झालं आहे," अशी घणाघाती टीका त्यांनी केली. ते अनंत तरे यांच्या आठवणीवर आधारित 'आठवणीतले अनंत तरे' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
ठाकरे म्हणाले, "ठाण्यात विकासाच्या नावाखाली पैसे लुटले जात आहेत. मुंबई आणि ठाणे महापालिकेची तिजोरी भ्रष्ट लोकांनी लुबाडली आहे. विकास झाला असे म्हणतात, पण ट्राफिक, रस्त्यांची अवस्था आणि नागरी अडचणी पाहता हा विकास फक्त काही लोकांच्या खिशात गेला आहे." यावेळी त्यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली. "२०१४ मध्ये युती तुटली, तो काळच शिवसेना संपवण्याचा डाव होता. पण आम्ही लढलो, आणि आजही लढत आहोत. गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही," असे ते म्हणाले.
ठाकरे यांनी अनंत तरे यांचे कौतुक करताना म्हटले, "शिवसेनेची सेवा हेच त्यांचं व्रत होतं. संकटं आली, तरी त्यांनी कधीही भगवा झेंडा सोडला नाही. त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे." कार्यक्रमात त्यांनी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, "येणाऱ्या सोमवारी ठाण्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मनसेसह अन्य पक्षांचाही सहभाग असणार आहे."
"शिवसेनेवर कितीही संकटं आली, तरी शिवसैनिक छातीठोकपणे उभा राहतो. आता वेळ आली आहे की, आपल्या मुळावर आलेल्या शत्रूंना उखडून फेकावं," असे सांगत त्यांनी ठाणेकरांना एकजूट होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन दोस्ती फाउंडेशन आणि अनंत तरे फाउंडेशन यांनी केले होते. ठाकरे यांच्या भाषणाला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी पुस्तक वाचण्याचे आवाहन करत, “फक्त पुस्तक वाचू नका, त्यातून शिकून कृती करा,” असा संदेश दिला.