परभणीत ठाकरे गटासह विरोधकांना धक्का; एकाचवेळी 40 सरपंचांचा शिंदे गटात पक्षप्रवेश
Admin

परभणीत ठाकरे गटासह विरोधकांना धक्का; एकाचवेळी 40 सरपंचांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

सत्तांतरानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सत्तांतरानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. त्यांच्यातील वाद चांगलाच तापला आहे. शिंदे गट ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के देत आहे. याच पार्श्वभूमीवर आता परभणीत शिंदे गटाने ठाकरे गटासह विरोधकांना देखिल धक्का दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील 40 सरपंच, उपसरपंच, सभापती, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी खासदार भावनाताई गवळी, आमदार संजय शिरसाट, आमदार बालाजी कल्याणकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय म्हशीलकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव सुशांत शेलार, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, परभणीतील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते सईद खान तसेच सर्व आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे 1593 सरपंच निवडून आले होते. त्यात अजून 40 जणांची भर पडली आहे." "तुम्ही पक्षावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू तसेच तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु,"असे शिंदे म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष सरपंचांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंजाभाऊ टाकळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद पाटील यांचाही यात समावेश आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष मोईन अन्सारी, माजी उपनगराध्यक्ष युसूफ अन्सारी, नगरसेवक नामदेव चिंचाणे, शंकर चिंचाणे, परभणीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश नवघरे, परभणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ साखरे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मानवत पंचायत समिती सभापती शिवाजी उक्कलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. याप्रसंगी त्यांचे स्वागत करत या सर्वांना भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com