मुंबईसह कोकणात ऑरेंज अर्लट; मुख्यमंत्री शि्ंदेंनी नागरिकांना केलं आवाहन

मुंबईसह कोकणात ऑरेंज अर्लट; मुख्यमंत्री शि्ंदेंनी नागरिकांना केलं आवाहन

मुंबई महानगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य व हार्बर रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

मुंबई महानगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य व हार्बर रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसामुळे मुंबईत उद्भवलेल्या परिस्थितीचा नियंत्रण कक्षातून आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

“राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये”, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

मुंबईत २६७ ते ३०० मिमी इतका पाऊस झाला आहे. जर ६५ मिमीच्या वर पाऊस झाला तर मुंबईत अतिवृष्टीसारखीच परिस्थिती निर्माण होते. त्यात मुंबईत ३०० मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही रेल्वेच्या रुळांवर पाणी आलं. चुनाभट्टी सायन या ठिकाणीही पाणी साचलं. यामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली. परंतु रेल्वे, पालिका आणि राज्य सरकार या सर्वांनी मिळून काम केले आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

रेल्वेचे २०० पंप सुरु आहे. मुंबई महापालिकेचे ४८१ पंप सुरु आहेत. हे पंप पाण्याचा निचरा करण्याचे काम करत आहेत. हिंदमाता, गांधी मार्केट, मिलन सबवे या ठिकाणी पाणी साचलं नाही. कारण याठिकाणी असलेल्या पंपाने तातडीने काम केले. होल्डिंग पाँडचाही मोठा फायदा झाला आहे. तसेच रेल्वेच्या खाली मायक्रो टनलिंग केलेल्याचाही खूप मोठा फायदा होत आहे. देशात पहिल्यांदाच होल्डिंग पाँड आणि मायक्रो टनलिंगसारखी सुविधा मुंबईत उपलब्ध आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com