Aaditya Thackeray on Shivsena : आमची खरी शिवसेना, दुसरी 'शाह'सेना, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असली, तरी त्याचा आमच्या पक्षाला किंवा मनसेसोबतच्या युतीला फारसा परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला:
विधानसभेच्या निवडणुकांत काँग्रेससोबत लढण्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे; त्यातून काही फायदे तर काही मर्यादा देखील समोर आल्या. मात्र, पालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्न, कॅडर आणि विश्वास याला जास्त महत्त्व असते. मुंबईकर जात, धर्म, पंथ न पाहता ज्याच्यावर विश्वास ठेवतात, तो नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांची साथ आणि शरद पवार यांचे आशीर्वाद यामुळे ही ताकद अधिक मजबूत झाली असून, मुंबईवर प्रेम करणारा मतदार आमच्यासोबतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धारावी पुनर्विकासासारख्या संवेदनशील मुद्द्यावर ते बोलले :
गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही पक्ष म्हणून धारावीकरांच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. भूमिका न बदलता धारावीकरांना न्याय मिळावा यासाठी लढण्याची ताकद आणि कॅडर फक्त आमच्याकडे आहे, हे धारावीकरांनाही आणि मुंबईकरांनाही माहीत आहे. सर्व समाजांना न्याय द्यायचा असेल, तर उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा दावा त्यांनी केला.
मनसेसोबतच्या युतीकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहताना त्यांनी सांगितले : ठाकरे कुटुंब २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणे हा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि भावनिक क्षण होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर आजोबांपासून ते तरुण पिढीपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.
त्रिभाषा सूत्र आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येताना एक वेगळी ऊर्जा आणि चार्ज जाणवला : दोन वेगवेगळे पक्ष असले तरी दोन्ही पक्षांच्या विचारधारा जवळपास समान आहेत; काही मतभेद हे नैसर्गिक आहेत. मात्र कुटुंब म्हणून पुन्हा जुळलेलं नातं आणि ‘आपला भाऊ आपल्या सोबत आहे’ ही भावना मराठी माणसासाठी मोठी ताकद ठरत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केले.
भाजपमध्ये आयारामांना संधी, निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा
राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी, पक्षांतर आणि राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून “आयाराम-गयाराम” आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना संधी दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेल्या दोन-तीन वर्षांत ज्यांच्यावर भाजपने आरोप केले, ईडीच्या कारवाया केल्या, तेच लोक आज भाजपसोबत सत्तेत बसलेले दिसतात. जे घाबरले, जे जेलच्या भीतीने दबले, त्यांनी भाजपमध्ये उड्या मारल्या.”
ईडी आणि हिंदुत्वावर बोचरी टीका
आदित्य ठाकरे यांनी एका कार्टूनचा संदर्भ देत भाजपवर टीका केली. “ईडीचं कार्यालय आणि त्यावर हिंदुत्वाची पाटी, असा संदेश जातो की ईडी कार्यालयात गेल्यावरच कुणाचं हिंदुत्व आणि देशभक्ती जागृत होते,” असा टोला त्यांनी लगावला. भाजपकडून ईडीचा राजकीय दबावासाठी वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाष्य
एकनाथ शिंदेंच्या बंडावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केला. “20 मे 2022 रोजी एकनाथ शिंदे वरच्या बंगल्यावर येऊन रडले होते. ‘आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही’ असं ते म्हणाले होते आणि त्यानंतर 20 जूनला त्यांनी बंड केलं,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच दोन दिवसांतच “दादा” (अजित पवार यांचा अप्रत्यक्ष उल्लेख) सत्तेत सहभागी झाल्याचा दाखला देत, आरोप करणारे आणि आरोप सहन करणारे एकाच मंचावर बसले असल्याचं त्यांनी नमूद केलं.
भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती
आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. “मुंबईत प्रकाश मेहता, राज पुरोहित, विनोद तावडे यांसारख्या नेत्यांनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी आयुष्य झोकून दिलं. काहींनी संसार सोडला, लग्नही केलं नाही. पण आज हे कार्यकर्ते बाजूला पडले असून, ज्यांच्यावर आरोप होते ते सत्तेत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पालघर साधू हत्याकांडावर प्रश्न
पालघर साधू हत्याकांडाचा उल्लेख करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “त्या घटनेनंतर आम्ही राजकारण केलं नाही. पण भाजपने त्या प्रकरणातील प्रमुख आरोपीला पक्षात घेतलं. देशभर टीका झाल्यानंतर त्याला स्थगिती दिली. जर तो निर्दोष होता, तर छातीठोकपणे सांगा की तो निर्दोष आहे; मग स्थगिती का?”
हिंदुत्व सोडल्याचा आरोप फेटाळला
महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हा भाजपचा आरोप आदित्य ठाकरे यांनी फेटाळला. “आम्ही काँग्रेससोबत गेलो तेव्हा आम्ही हिंदुत्व सोडलं, असं भाजप म्हणत होती. मग काल भाजप काँग्रेससोबत गेली तेव्हा त्यांनी काय सोडलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अंबरनाथ, अमरनाथ आणि अकोटमधील राजकीय आघाड्यांचे उदाहरण देत त्यांनी भाजपच्या भूमिकेतील विसंगती अधोरेखित केली.
‘मी फक्त मुद्द्यांवर बोलतो’
आदित्य ठाकरे म्हणाले, “माझ्या शाखाभेटी, मुलाखती किंवा विधानसभेतील भाषणं पाहिली तर लक्षात येईल की मी केवळ मुद्द्यांवर बोलतो – प्रश्नोत्तराच्या तासातही.”
काँग्रेस-वंचित आघाडीवर प्रतिक्रिया
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, “प्रत्येक पक्षाला आपल्या निर्णयाचा अधिकार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र लढल्यावर फायदे-तोटे आम्ही पाहिले आहेत. पालिका निवडणुकीत वेगळं गणित असतं. मुंबईकर जात, धर्म, पंथ न पाहता काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडीचा परिणाम होणार नाही; मनसे-शिवसेना युतीत नवी ऊर्जा:
यंदाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आघाडीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेला फटका बसेल का, या प्रश्नावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “मुंबईकर जात, धर्म, पंथ न पाहता कोण त्यांच्या हक्कासाठी लढू शकतो, सेवा करू शकतो, हे पाहतात,” असं ठामपणे सांगत त्यांनी काँग्रेस-वंचित आघाडीचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो. त्याचे फायदे-तोटे आम्ही पाहिले आहेत. पण पालिका निवडणूक वेगळी असते. काँग्रेस-वंचितची आघाडी हा त्यांचा पक्षीय निर्णय आहे. प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.”
उद्धव ठाकरे हेच मुंबईचा विश्वास
आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईकरांना माहीत आहे की सर्व समाजांना न्याय देऊ शकणारी, त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारी एकमेव व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता त्यांना राज ठाकरे यांची ताकद मिळाली आहे, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत. हे सगळं मिळून पुरेसं आहे. मुंबईप्रेमी लोक आमच्यासोबतच राहतील.”
धारावीचा मुद्दा निर्णायक
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी ठाम भूमिका मांडली. “धारावीचा विषय गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही सातत्याने मांडतोय. पक्ष म्हणून, धारावी बचाव समिती म्हणून – सर्व पक्ष त्यात सहभागी आहेत. पण आकडे न बदलता, धारावीकरांच्या हक्कासाठी लढण्याची ताकद आणि कॅडर आमच्याकडे आहे,” असं ते म्हणाले.
“धारावीला आणि धारावीकरांना न्याय द्यायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे धारावीकरांनाही माहीत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
मनसे-शिवसेना युती : भावनिक क्षण
मनसेसोबतच्या युतीबाबत बोलताना आदित्य ठाकरे भावूक झाले. “इतक्या वर्षांनंतर कुटुंब एकत्र आलं. दोन भाऊ एकाच व्यासपीठावर आले. मराठी माणसाला खूप बरं वाटलं,” असं ते म्हणाले.
डोममध्ये झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख करत ते म्हणाले, “त्या स्टेजवर आजोबांच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तो क्षण फक्त राजकीय नव्हता, तर भावनिक होता.”
२० वर्षांचा दुरावा संपला
“२० वर्षांपूर्वी उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी वेगवेगळ्या पक्षांमधून काम करण्याचा निर्णय घेतला. विचारधारा जवळपास सारखी आहे, काही पद्धती वेगळ्या असू शकतात. पण कुटुंब म्हणून जो दुरावा होता, तो आता संपला आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“फॅमिली म्हणून एकमेकांबद्दल असलेली खात्री, ‘आपला भाऊ सोबत आहे’ ही भावना खूप वेगळी असते,” असं त्यांनी सांगितलं......
मराठी माणसाची भावनिक प्रतिक्रिया
या एकत्र येण्याचा परिणाम जनतेत कसा दिसतो, याचं उदाहरण देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “डोमचा कार्यक्रम झाल्यानंतर मी एका पुस्तक दुकानात होतो. एक वयस्कर जोडपं माझ्याकडे आलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते म्हणाले ‘आज आम्हाला आमचं कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं दिसलं.’ हा क्षण मी कधी विसरणार नाही.”
आव्हानं असली तरी आत्मविश्वास
मनसे-शिवसेना एकत्र निवडणूक लढवताना आव्हानं असणार हे मान्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “बंडखोरी, पक्षांतर हे सगळ्या पक्षांमध्ये आहे. पण आम्ही कुटुंब म्हणून, मराठी अस्मितेसाठी आणि मुंबईसाठी एकत्र आलो आहोत. हीच आमची खरी ताकद आहे.”
पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे-शिवसेना (उद्धव गट) युती आणि काँग्रेस-वंचित आघाडीमुळे मुंबईतील राजकारण अधिक रंगतदार होण्याची चिन्हं दिसत आहेत.

