Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प 'नोबेल'चे मानकरी, पाकिस्तानने गायले गोडवे; ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पारितोषिकाची मागणी केली आहे. अलीकडे पाकिस्तान सरकारने त्यांचे 2026 सालच्या नोबेल शांतता पारितोषिकासाठी औपचारिक नामांकन केल्यावर ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भारत-पाकिस्तान संघर्षासह रवांडा-काँगो आणि सर्बिया-कोसोवो यांसारख्या अनेक जागतिक संघर्षांमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी केला.
“रवांडा, काँगो, सर्बिया-कोसोवो आणि विशेषतः भारत-पाकिस्तानसारख्या गंभीर मुद्द्यांवर मी शांतता स्थापनेसाठी मोठं काम केलं आहे. मला चार-पाच वेळा नोबेल मिळायला हवं होतं,” असं ट्रम्प म्हणाले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या "निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप आणि नेतृत्वा"चा दाखला देत, त्यांच्या नामांकनाची माहिती X वर दिली.
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यात ट्रम्प यांनी भूमिका बजावल्याचा दावा त्यांनी केला असला तरी, भारत सरकारने हे दावे वारंवार फेटाळले आहेत. याशिवाय, ट्रम्प यांनी रवांडा आणि काँगोमधील संघर्ष थांबवण्यासाठी सोमवारी एक शांतता करार होणार असल्याचा उल्लेख केला, मात्र त्या कराराची माहिती अस्पष्ट आहे आणि अमेरिकेच्या सहभागाबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
"मला नोबेल देत नाहीत कारण मी उदारमतवादी नाही," असा आरोप ट्रम्प यांनी केला. अब्राहम करारामुळे त्यांना यापूर्वीही नोबेलसाठी नामांकन मिळालं होतं, मात्र पुरस्कार मिळालेला नाही. नॉर्वेच्या नोबेल समितीने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.