दहशतवाद्यानं फोडलं पाकिस्तानचं बिंग; भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी 30 हजारांची ऑफर

दहशतवाद्यानं फोडलं पाकिस्तानचं बिंग; भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी 30 हजारांची ऑफर

नौशेरा सेक्टरमध्ये पकडलेल्या दहशतवाद्याची कबुली

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी उधळून लावला. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या एका दहशतवाद्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. भारतातील लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या एका कर्नलने 30 हजार रुपये देऊन पाठवले असल्याचे दहशतवाद्याने कबुल केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये 21 ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना मिळाली. यावर तात्काळ कारवाई करत तीन पैकी दोन दहशतवाद्यांचा लँडमाईन स्फोटात खात्मा झाला. यामधील एक घुसखोर भारतीय चौकीच्या जवळ होता. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जवानांनी गोळीबार सुरु केला आणि यामध्ये तो जखमी झाला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून तबरक हुसैन असे या पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

दहशतवाद्याची चौकशी केली असता तो म्हणाला, मी, इतर चार ते पाच जणांसह येथे आत्मघातकी मोहिमेवर आलो होतो. पाकिस्तानी लष्कराचे कर्नल युनूस यांनी येथे पाठवले होते. त्यांनी मला भारतीय लष्कराला लक्ष्य करण्यासाठी 30,000 रुपये दिले, असे हुसैनने आज एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

तर, घुसखोर दहशतवाद्याला लष्कर-ए-तोय्यबा (एलईटी) ने 'फिदाईन' (आत्मघाती बॉम्बर) म्हणून पाठवले होते, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तबरक हुसैन पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्याचा तो रहिवासी आहे. विशेष म्हणजे हुसैनने याआधीही नियंत्रण रेषा पार केली होती. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. पण, माणुसकीच्या आधारे हुसैनला पुन्हा परत पाठवण्यात आलं होतं, असेही लष्कराने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com