PAN Card : मृत व्यक्तीचे PAN कार्ड रद्द करणे का आवश्यक? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या..
देशात 31 मार्च 2024 पर्यंत 74.69 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना पॅन कार्ड (Permanent Account Number) जारी करण्यात आले आहे. हे कार्ड केवळ आयकर रिटर्नसाठी नव्हे, तर बँकिंग, गुंतवणूक, मालमत्ता व्यवहार, आणि आर्थिक ओळखीचा अत्यावश्यक दस्तऐवज म्हणून ओळखले जाते. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पॅन कार्डचे काय होते, हे फारच कमी लोकांना ठाऊक असते. अनेकदा या पद्धतीकडे दुर्लक्ष होत असल्याने फसवणूक, गैरवापर आणि कर संबंधित गुंतागुंती निर्माण होण्याचा धोका निर्माण होतो.
मृत व्यक्तीचे पॅन रद्द करणे का गरजेचे?
- आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी
- बँक आणि डीमॅट खाती बंद करण्यासाठी
- आयकर विभागाकडून येणारी भविष्यातील नोटिस टाळण्यासाठी
- योग्य कायदेशीर वारसाला मालमत्ता हस्तांतर करण्यासाठी मृत व्यक्तीची आर्थिक ओळख पूर्णतः संपुष्टात आणण्यासाठी
पॅन रद्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. मृत व्यक्तीचे मूळ पॅन कार्ड
2. मृत्यू प्रमाणपत्राची अधिकृत प्रत
3. कायदेशीर वारसाचे पॅन कार्ड
4. मृत व्यक्तीशी नाते दर्शवणारे कागद (उदा. मृत्युपत्र, आधार कार्ड, वारस प्रमाणपत्र)
5. पॅन रद्द करण्यासाठी लेखी अर्ज
ई-फायलिंग पोर्टलवरून पॅन रद्द करता येत नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे भौतिक स्वरूपातच पार पाडावी लागते.
AO कसा शोधावा?
‘Know Your AO’ ही सुविधा आयकर विभागाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथे पॅन नंबर टाकून संबंधित मूल्यांकन अधिकाऱ्याचे नाव व कार्यालयाचा पत्ता मिळवता येतो.
पॅन रद्द होण्यासाठी किती वेळ लागतो?
प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 10 ते 15 दिवसांत पॅन निष्क्रिय होतो. काही वेळा अधिकाऱ्यांकडून पुष्टीकरणाचा संदेश नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जातो.
पॅन रद्द करण्याआधी लक्षात ठेवाव्या काही बाबी -
मृत व्यक्तीचे अंतिम आयकर रिटर्न कायदेशीर वारसाने दाखल करणे आवश्यक
मृत व्यक्तीच्या खात्यांशी संबंधित कोणताही कर परतावा असल्यास, प्रतिनिधी करदाता म्हणून आयकर पोर्टलवर नोंदणी करणे
सर्व कागदपत्रांची प्रत नीट आणि स्पष्ट असावी.
मृत व्यक्तीच्या पॅन कार्डाबाबत वेळेवर कारवाई न केल्यास गंभीर वित्तीय आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि वेळेत पॅन रद्द करणे ही एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी पार पाडताना या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होऊ नये.