Pankaja Munde : 'धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती'
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
यातच आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा सोपवला असून मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा स्विकारला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख यांना मारण्याचासंदर्भातलं काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं. मला त्याविषयी माहिती नाही पण मी एक पोस्ट पाहिली. जे व्हिडिओ बघायची माझी हिंमत देखील झाली नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होते. यामध्ये कोणाचा हात आहे हे केवळ तपास यंत्रणांनाच माहित आहे. ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे त्या मुलांमुळे समस्त राज्यातील समाज ज्यांचा काही दोष नाही तोसुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे. संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून त्यांच्या आईची क्षमा मागते.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नाही पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागलं नसते. घेणाऱ्यांनीसुद्धा आधी घेतला पाहिजे होता, धनंजयनेसुद्धा आधी द्यायला पाहिजे होता. लहान बहीण असलं तरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होते. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.