पनवेलला शिंदे गटाकडून महाविकास आघाडीला सुरुंग

पनवेलला शिंदे गटाकडून महाविकास आघाडीला सुरुंग

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षातील नेतेही आकर्षित होऊ लागले आहेत. त्याचाच परिपाक पनवेलमध्ये ही दिसून आला.

हर्षल भदाणे पाटील, पनवेल

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षातील नेतेही आकर्षित होऊ लागले आहेत. त्याचाच परिपाक पनवेलमध्ये ही दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी आपल्या मनगटातील राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हातामध्ये शिंदे गटाचा झेंडा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील शेकापचे नेते अर्जुन डांगे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचा गटाला समर्थन देऊन लाल बावटयाची साथ सोडली आहे. रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे इन्कमिंग सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भारतीय जनता पक्षाशी घरोबा केला. त्यांच्यासमवेत पन्नास आमदार, बारा खासदार त्याचबरोबर सेनेचे जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आजही मोठ्या प्रमाणात पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. शिवसेनेला सुरुंग लावत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनाही धक्का देण्याचे काम केले जात आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यां बरोबरच महा विकास आघाडी च्या घटक पक्षांना सुरुंग लावण्याचे काम सुरू झाले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com