पापलेटला मिळाला सरकारी मान, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

पापलेटला मिळाला सरकारी मान, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता? महाराष्ट्र सरकारने सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. हा मासा मत्स्यप्रेमींसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.
Published by  :
Team Lokshahi

खळाळत्या निळ्या समुद्रातून जाळ्यात आलेला रुपेरी पापलेट मासा म्हणजे मत्स्यप्रेमींसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. तव्यावरील चुरचुरीत व मसाल्याने अवगुंठित झालेले पापलेट फ्राय असो... मिरची, आले, लसूण यांच्याशी जुळलेल्या घट्ट मैत्रीतून निर्माण झालेले पापलेटचे कालवण असो... वा अंतरंगात ओले खोबरे, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता आदींचे मिश्रण अलगद सारून निगुतीने केलेले भरलेले पापलेट असो... खवय्यांसाठी हे सारेच पदार्थ म्हणजे खाद्यानंदात मनसोक्त डुंबण्याची हमीच. हा असा कीर्तिवंत मासा आता राज्य मासा म्हणून यापुढे ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी ही घोषणा केली.

सिल्व्हर पॉम्पलेट अर्थात पापलेट माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा मिळाला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पापलेट माशाला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. अनेक मच्छिमार संस्थानी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे यासंबंधित मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य झाल्याने मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यात सिल्व्हर पॉम्फ्रेटच्या उत्पादनात होत असणारी घट ही चिंताजनक आहे. त्यामुळं या प्रजातीचे जतन करण्याच्या दृष्टीने मच्छिमार संघटनांनी ही मागणी उचलून धरली होती. राज्य सरकारने या मत्स्य प्रजातीचे महत्त्व जाणून टपाल तिकिटही जारी केले आहे. माशाला अधिकृत राज्य माशाचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण होण्यास मदत मिळेल, अशी भावना मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सिल्व्हर पॉम्पलेटचा स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा या नावानेही ओळखले जाते. राज्यात सर्वात जास्त निर्यात पापलेट या माशाची केली जाते. मात्र, 1980 पासून त्याचे उत्पादन घट होत जात आहे. त्यामुळं हा मासा दुर्मिळ होत चालला आहे. त्याचबरोबर, पालघरमधील सातपाटी येथील समुद्रात मिळणाऱ्या माशाला एक विशिष्ट चव आहे, त्यामुळं येथील माशाला मोठी मागणी आहे.

दरम्यान, पापलेट ही मस्त्य प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करता येणार आहेत. मासेमारी पद्धतीलील बदलांमुळं लहान पापलेट माशांची मासेमारी मोठ्या प्रमाणात गेली गेली. त्यामुळं माशांच्या प्रजातीवर मोठ्या प्रणाणात परिमाम झाला आणि उत्पादनात घट होत गेली. मात्र सरकारच्या या निर्णयामुळं पुन्हा उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com