Ratnagiri
Ratnagiri Team Lokshahi

परशुराम घाट पावसाळ्यापूर्वी राहणार सात दिवस बंद

पर्यायी असलेला चिरणी आंबडस या मार्ग होतोय सज्ज.

निसार शेख|रत्नागिरी: कोकणात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले कित्येक वर्ष रडत खडत सुरू आहे याच मार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाट हा गेल्या वर्षीच्या पावसात धोकादायक बनला होता. हा घाट गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर्षीही या पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागू नये यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने किमान सात दिवस घाट बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सज्ज करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

चिरणी आंबडस या पर्यायी मार्गाला प्रमुख जिल्हामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या मार्गाच्या आपग्रेडेशचे कामही सुरू आहे. मात्र हा घाट पावसाळ्यापूर्वी नेमका कधी सात दिवस बंद राहील याचं नियोजन अद्याप ठरलेलं नाही.परशुराम घाटाला पर्याय म्हणून यावर्षीही चिरणी या मार्गावरच भिस्त असून परशुराम घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्यादृष्टीने हा घाट वाहतुकीसाठी किमान सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. या महामार्गावर काम करत असलेल्या कल्याण टोलवेज या कंपनीकडून काही परशुराम घाटाच्या कामासाठी हा महामार्ग किमान सात दिवस पूर्ण बंद ठेवावा लागेल असा अभिप्राय बांधकाम विभागाला कळवण्यात आला आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक किमान सात दिवस बंद राहील मात्र अद्याप व्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे या घाटातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असलेला चिरणी-आंबडस हा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे, ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येतील असेही बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत जी काही रखडलेली कामे शिल्लक आहेत ते लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने युद्धपातळीवर काम करण्यात येतील. नॅशनल हायवे ऍथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना मुंबईत झालेल्या बैठकीच्यावेळी मंत्री ना. चव्हाण यांनी दिल्या. तसेच जे काम अपूर्ण राहिले आहे, त्या सर्व कामांची प्रगती पाहण्याच्यादृष्टीने या कामाचे शुटींग ड्रोनच्या सहाय्याने करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉटस आहेत ते काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला पर्याय मार्ग असलेल्या चिरणी आंबडस या प्रमुख जिल्हा मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी टेंडर काढून कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. पूर्वी हा मार्ग 3.75 इतक्या रुंदीचा होता तो आता पाच मीटर इतका रुंद होणार आहे तसेच या मार्गावरील काही ठिकाणी आवश्यक असलेल्या ब्रिजचेही काम हाती घेण्यात आला आहे. या मार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे जायच्या मार्गावर आहे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com