Priya Phuke : 'न्यायव्यवस्था आमच्या खिशात'; सासरच्या मंडळींकडून प्रिया फुकेंना धमकी, परिणय फुकेंच्या वहिनीनं केले थेट आरोप
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांतील महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराचे नवीन प्रकरण समोर आले आहे. भाजप आमदार परिणय फुके यांची वहिनी प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सासरच्या मंडळींकडून झालेल्या छळाची माहिती दिली आहे. या परिषदेला सुषमा अंधारे (ठाकरे गट) व रोहिणी खडसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चा नेत्या उपस्थित होत्या.
प्रिया फुके यांनी सांगितले की, त्यांचे पती संकेत फुके यांच्यावर विवाहापूर्वी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी लपवली. 2022 मध्ये त्यांच्या पतीचा फुफ्फुसाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या दहा वर्षांचा मुलगा व आठ वर्षांच्या मुलीसोबत प्रिया मागील दीड वर्षांपासून माहेरी राहत आहेत.
त्यानंतर प्रिया यांनी जेव्हा सासरच्या मंडळींना या फसवणुकीबाबत विचारले, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या गेल्या. त्यांच्या घरातील प्रॉपर्टी संदर्भात परस्पर व्यवहार करण्यात आले आणि या गोष्टीला विरोध केल्यावर त्यांना रात्री उशिरा घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर सातत्याने गुंड पाठवून त्रास देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
प्रिया फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन-चार वेळा भेट घेतली. आपली तक्रार, पुरावे आणि कागदपत्रे दिली. मात्र काहीच कारवाई झाली नाही. महिला आयोगाकडे देखील त्यांनी तक्रार दाखल केली होती. तरी तिथुनही कोणतीही मदत मिळाली नाही. पोलीस ठाण्यात अनेकदा त्या गेल्या तरीही तक्रार स्वीकारली जात नव्हती.
त्यांच्यावर खोट्या गुन्ह्यांचे आरोप करण्यात आले आणि मुलांचा ताबाही हिरावून घेण्याचा प्रयत्न सासरच्यांनी केला. "न्यायव्यवस्था आमच्या खिशात आहे," अशा प्रकारच्या धमक्याही दिल्या गेल्या, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शेवटी त्या म्हणाल्या, "मला फक्त माझा हक्क आणि न्याय हवा आहे."