AC Local : विनातिकीट प्रवाशांवर अखेर कारवाई, पावणेदोन कोटींचा दंड वसूल

AC Local : विनातिकीट प्रवाशांवर अखेर कारवाई, पावणेदोन कोटींचा दंड वसूल

पकडलेल्या प्रकरणांच्या संख्येत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित, सामान्य लोकलमधून विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. विनातिकीट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत वातानुकूलित लोकलमधून 51 हजार 600 विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 1.72 कोटी रुपये दंड वसूल केला.

पश्चिम रेल्वेवर सध्या 109 वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सुमारे 1.26 लाख प्रवासी प्रवास करतात. 2024-25 या आर्थिक वर्षात मुंबई सेंट्रल विभागाच्या तिकीट तपासणी पथकाने वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची 51 हजार 600 पेक्षा अधिक प्रकरणे सापडली. या प्रकरणातून दंड म्हणून 1.72 कोटी रुपये वसूल केले. जानेवारी २०२५ मध्ये विनातिकीट प्रवासाच्या 6,258 प्रकरणांमध्ये 20.97 लाख रुपये दंड वसूल केला.

जानेवारी 2024 मध्ये 4743 प्रकरणांमध्ये 16.04 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडाच्या रकमेत 31 टक्के आणि पकडलेल्या प्रकरणांच्या संख्येत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुधारण्यासाठी आणि वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांचा प्रवास रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

त्यात अनियमित प्रवासाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी वातानुकूलित लोकलमध्ये एक पथक तयार केले आहे. या पथकामार्फत नियमित तपासणी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच वातानुकूलित लोकल प्रवाशांना तक्रार करण्यासाठी मदतवाहिनी क्रमांक १३९ प्रदान करण्यात आला आहे. तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 9004497364 वर तक्रार करता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com