Ajmer Darga Controversy: अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर?
अजमेरमधील प्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या जागी पूर्वी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका राजस्थानमधील एका स्थानिक न्यायालयाने स्वीकारली आहे. न्यायालयाने बुधवारी दर्गा प्रशासनासह संबंधितांना नोटीस बजावली असून २० डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
थोडक्यात
अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर?
राजस्थानातील न्यायालयाकडून याचिकेचा स्वीकार;
संबंधितांना नोटिसा
पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसा भडकली असतानाच आता अजमेर दर्ग्यावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर पश्चिम दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायाधीश मनमोहन चंदेल यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. याबाबत माहिती देताना याचिकाकर्त्यांचे वकील योगेश सिरोजा म्हणाले, की दर्ग्याच्या जागी पूर्वी ‘संकट मोचन महादेव मंदिर’ असल्याचा दावा करणारी याचिका सप्टेंबरमध्ये दाखल करण्यात आली होती. यावर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने याचिका दाखल करून घेत दर्गा समिती, अल्पसंख्याक विभाग आणि पुरातत्व विभागाला नोटीस बजावली.
याचिकाकर्त्यांनी काय केला दावा?
● अजमेरचे रहिवासी हरविलास शारदा यांच्या १९११ साली लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला
● शिवमंदिरात पूर्वी पूजा-जलाभिषेक होत असे
● दर्ग्याच्या तळघरात शिवमंदिराचा गाभारा
● दर्गा परिसरातील ७५ फुटी ‘बुलंद दरवाजा’च्या उभारणीमध्ये मंदिराच्या अवशेषांचा वापर
मशिद नव्हे शिवमंदिर, याआधी कुठे सापडलं मशिदीत दडलेलं शिवमंदिर?
उत्तर प्रदेशातील वाराणासी येथील ज्ञानव्यापी मशिदीवरून सध्या वाद सुरु आहे. ज्ञानव्यापी येथे मूळ शिवमंदिर असल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व खात्याला मशिदीमध्ये सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. सर्वेक्षणादरम्यान मशिदीमध्ये शिवमंदिराचे अवशेष आढळून आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मशिदीमध्ये हिंदू धर्मानुसार पूजा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मशिदीतील काही ठिकाणी सर्वेक्षण करण्याची परवानगी मिळावी याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी प्रलंबित आहे. तसेच मशिदीत शिवलिंग सापडल्यानं हे शिवमंदिर असून त्यानुसार नव्याने मंदिर बांधण्यास परवानगी तसेच पूजेस परवानगी मिळावी याविषयी याचिका कोर्टात प्रलंबित आहे.