Pitru Paksha : ७ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात! 'या' गोष्टी चूकुनही करु नका
थोडक्यात
उद्यापासून म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्षाला प्रारंभ
पितृपक्षाच्या काळात काही गोष्टी करणं टाळावा
कोणती कामं पितृपक्षात करू नयेत?
उद्यापासून म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्षाला प्रारंभ होतो आहे. हिंदू सनातन धर्मात या पंधरवड्याला वेगळंच स्थान आहे. आपल्या पूर्वजांची आठवण, त्यांना अन्न-तर्पण अर्पण करणं आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करणं, हे पितृपक्षाचं सार आहे. मान्यता अशी आहे की, या 15 दिवसांत पितर स्वतः आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात.
त्यामुळे हा काळ केवळ धार्मिक विधींचाच नसून कृतज्ञतेची जाणीव करून देणारा आहे. तथापि, धर्मशास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की पितृपक्षाच्या काळात काही गोष्टी करणं टाळावं. कारण चुकीची कृती पितरांना अप्रसन्न करू शकते. आपल्यावर त्यांचे आशीर्वाद राहावेत, कुटुंबाची समृद्धी, सौख्य टिकावं यासाठी परंपरेनं सांगितलेले नियम पाळणं आवश्यक मानलं जातं.
कोणती कामं पितृपक्षात करू नयेत?
1. शुभ कार्य वर्ज्य
विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी कोणतीही मंगल कार्ये या काळात टाळली जातात. कारण हा काळ स्मरणाचा आहे, उत्सवाचा नाही.
2. खोटेपणा आणि अपशब्द टाळा
या पंधरवड्यात सत्य, संयम आणि शुद्ध वर्तनावर भर दिला जातो. खोटं बोलणं किंवा अपशब्द वापरणं हे पितरांचा अनादर मानलं जातं.
3. काही पदार्थ वर्ज्य
पितृपक्षाच्या काळात मद्य, मांसाहार, कांदा, लसूण, वांगी, मुळा, दुधी, मसूर डाळ, काळं मीठ, पांढरे तीळ आणि शिळं अन्न खाणं निषिद्ध आहे. अशा अन्नाचे सेवन हे पितरांना अप्रसन्न करणारे मानले जाते.
4. तर्पणातील शुद्धता
श्राद्धकर्म करताना केवळ काळ्या तिळांचा वापर केला पाहिजे. पांढऱ्या तिळांचा वापर शास्त्रविरोधी आहे. तसेच, जेवण शिजवताना लोखंडी भांड्यांचा वापर न करण्याची स्पष्ट सूचना आहे.
5. अन्न आधी चाखू नका
पितरांसाठी बनवलेलं अन्न आधी चाखून पाहणं चूक मानलं जातं. याशिवाय, या काळात घरासमोर आलेल्या गाय, ब्राह्मण, भिकारी किंवा गरजू व्यक्तींना दुर्लक्षित करणं टाळलं पाहिजे. त्यांचा मान राखणं हे पितरांना तृप्त करण्याचं माध्यम आहे.
6. श्राद्धाची योग्य वेळ
श्राद्ध आणि तर्पण विधी दुपारच्या वेळी करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात हा विधी केल्यास त्याचं फळ मिळत नाही, असं शास्त्र सांगतं.
परंपरेचं विज्ञान
आजच्या आधुनिक काळात अनेकांना हे नियम अंधश्रद्धा वाटू शकतात. मात्र यामागेही एक गहन विचार आहे. पितृपक्ष म्हणजे आपल्या मुळांची, वंशपरंपरेची जाणीव करून देणारा संस्कार आहे. आपल्याला जीवन दिलं, संस्कार दिले त्या पूर्वजांची आठवण ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हीच खरी या काळाची शिकवण आहे.
म्हणूनच पितृपक्ष हा फक्त धार्मिक विधींचा काळ नाही, तर आपल्या अस्तित्वाची पायाभरणी करणाऱ्यांप्रती आदर आणि स्मरण करण्याचा मार्ग आहे. श्रद्धा, नियम आणि परंपरा पाळून केलेला हा उत्सर्ग पितरांना तर तृप्त करतोच, पण आपल्या अंतर्मनालाही समाधान देतो.