Birthday Celebration : ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करताय ? मग थांबा ! सरकारने काढला नवा नियम
सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात आपले वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेमध्ये अशाप्रकारचे कार्यक्रम साजरे केल्यास शिस्तभंगाची कारवाई सरकारतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालयात काम करत असाल तर तुम्हाला आपल्या ऑफिस मध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा करता येणार नाही.
अनेकदा कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस त्यांच्याच कार्यालयात साजरा केला जातो. अनेकदा हे सेलिब्रेशन खूप वेळ चालते. बऱ्याच वेळेला वाढदिवसाची पार्टी म्हणून अनेक लोक कार्यालयीन वेळेत बाहेर जेवायला जातात. केवळ वाढदिवसच नव्हे तर फेअरवेल पार्टी किंवा आणखी काही खाजगी कार्यक्रमही कार्यालयात साजरे केले जातात.
मात्र या कार्यक्रमांवर सरकारी कार्यालयात बंदी घालण्यात आली आहे. अश्या प्रकारचे कोणतेही कार्यक्रम सरकारी कार्यालयात साजरे केले गेले तर यापुढे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार ही कारवाई केली जाणार असून शासनाकडून अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे. अश्या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे कार्यालयीन वेळ वाया जातो. त्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण होतो. असे शासनाने जाहीर केले आहे. हा नियम राज्यातील सर्वच शासकीय कार्यालये आणि कर्मचारी यांना बंधनकारक असणार आहे.
यावर उपाय म्ह्णून जर असे कोणतेही कार्यक्रम साजरे करायचे असतील तर ते सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळ संपल्यानंतर करता येऊ शकणार आहे. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे पाहायला मिळत आहे.