स्वार्थासाठी मूल्ये आणि तत्त्वांशी कशी तडजोड केली जातेय; विरोधकांच्या बैठकीवर पंतप्रधान मोदींची टीका
बंगळुरुत विरोधकांच्या झालेल्या बैठकीनंतर आता राजधानी दिल्लीत सत्ताधारी भाजप आणि एनडीएची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेतखाली सुरूअसलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह विविध 38 राजकीय पक्षांचे नेते एनडीए बैठकीला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या बैठकीवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षात असतानाही सकारात्मक राजकारण केले, आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केले नाही. आम्ही विरोधी पक्षात राहून सरकारांना विरोध केला, त्यांचे घोटाळे चव्हाट्यावर आणले, पण जनादेशाचा अपमान केला नाही, परकीय शक्तींची मदत घेतली नाही.
पुढे ते म्हणाले की, जनता पाहत आहे की हे पक्ष का जमत आहेत? या पक्षांना जोडणारा गोंद कोणता आहे, हेही जनतेला माहीत आहे. स्वार्थासाठी मूल्ये आणि तत्त्वांशी कशी तडजोड केली जात आहे. जेव्हा सत्तेच्या मजबुरीमुळे युती केली जाते, जेव्हा भ्रष्टाचाराच्या उद्देशाने युती केली जाते, जेव्हा युती कुटुंबवादाच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा जातीवाद आणि प्रादेशिकता डोळ्यांसमोर ठेवून युती केली जाते, मग त्या युतीमुळे देशाचे मोठे नुकसान होते.
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला
आपल्या देशात राजकीय आघाड्यांची प्रदीर्घ परंपरा आहे, परंतु नकारात्मकतेने झालेली कोणतीही युती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. काँग्रेसने 90 च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी आघाडीचा वापर केला. काँग्रेसने सरकारे स्थापन करून सरकारे बिघडवली आहेत.