Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

"निवडणुकीच्या तोंडावर मोदी स्टेजवर येतात आणि लहान मुलांसारखे रडतात"; नंदूरबारमध्ये प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मोदी सांगतात, आम्ही आदिवासी समाजाचा सन्मान करतो, पण जेव्हा खरी वेळ येते, तेव्हा ते मागे हटतात, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
Published by :

Priyanka Gandhi On Narendra Modi : गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं, हे जनतेसमोर सांगण्याची तुमच्याकडे हिंम्मत नाही. महागाईमुळं देशातील जनता रडत आहे. महिला दुकानात गेल्यावर रिकाम्या हाताने परत येतात. कारण देशात महागाई वाढली आहे. मोदींच्या जवळ कुणीच येत नाही. त्यांचे सल्लागार, त्यांचे नेतेही त्यांना घाबरतात. या देशातील शेतकरी कमाई करु शकत नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. शेती करणं कठीण झालं आहे. पैसे देऊन त्यांच्यावर दबाव टाकून आमदारांना खरेदी केलं आणि सर्वांच्या समोर त्यांनी त्यांचं सरकार स्थापन केलं. देशाची सर्व संपत्ती मोदींनी त्यांच्या अरबपती मित्रांना दिलीय. निवडणुकीच्या तोंडावर स्टेजवर येतात आणि मोदी लहान मुलांसारखे रडतात. आता खूप झालं, देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजप सरकारचा पराभव करा, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. त्या नंदूरबार येथे महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होत्या.

प्रियांका गांधी नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हणाल्या, नरेंद्र मोदी जे बोलतात आणि जे करतात, यामध्ये मोठी दरी आहे. मोदी सांगतात, आम्ही आदिवासी समाजाचा सन्मान करतो, पण जेव्हा खरी वेळ येते, तेव्हा ते मागे हटतात. मोदीजी गरिबांवर, आदिवासींबद्दल सांगतात, पण ते करतात एक आणि बोलतात एक. जो खरा सन्मान करतो, तो राजकीय फायद्यासाठी सन्मान करत नाही. मोदी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तुमच्याशी गोडगोड बोलतात. पण त्यांचा पक्ष सतत तुमचा अपमान करतो आणि मोदी फक्त पाहत बसतात. मोदी म्हणाले, मी शबरीचा पुजारी आहे. श्री राम प्रभूंनी शबरीचा सन्मान केला. शेकडो शबरींचा अपमान पाहून नरेंद्र मोदी गप्प बसले. आपल्या खेळाडू ऑलिम्पिकचं मेडल जिंकून येतात, तेव्हा मोदी त्यांच्यासोबत फोटो घेतात, त्यावेळी सर्व म्हणतात मोदी होते म्हणून शक्य झालं.

आमच्या खेळाडूंनी मेडल जिंकलं. तेच खेळाडू जेव्हा ओरडून ओरडून न्याय मागतात. रस्त्यावर रडून मोदींना मदत करण्याचं आवाहन करतात. खेळाडू जेव्हा सांगतात, आमच्यावर अत्याचार झाला आहे, तेव्हा मोदी घरातून बाहेर पडत नाही. मोदीजी काहीही बोलत नाहीत. मोदी शांत बसतात. यांच्या सरकारने अत्याचार करण्यांना मदत केली आणि त्यांना सुरक्षा दिली. अत्याचार करणाऱ्या नेत्यांच्या मुलांना तिकीट दिलं आणि ते आज निवडणूक लढत आहेत. पण आमच्या महिला अजूनही रडत आहेत. मोदी खोटं बोलतात. मतदान मागण्यासाठी मोदी भाषण करतात. त्यांच्या बोलण्यात ताकद नाही. मी भ्रष्टाचाराविरोधात एकटा लढत आहे, असं मोदी सांगतात. तुमच्याकडे सत्ता आहे, सर्व साधने आहेत.

तुमचेच लोक म्हणतात, तुम्ही जगातील सर्वात मोठे नेते आहेत. जगातील सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती तुमच्यासोबत आहेत आणि तम्ही म्हणता, मी एकटा लढतोय. मोदीजी सार्वजनिक जीवनात हिंम्मत करा. इंदिरा गांधींकडून शिकून घ्या. त्या दुर्गारूपी महिलेकडून शिका, ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यांच्याकडून शिका, हिंम्मत काय असते आणि वीरता काय असते. पण तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकत नाही. कारण तुम्ही महान शहिद महिलेला देशद्रोही म्हणता. पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपद आणि लोकशाहीचा आदर करायचे, पण मोदींनी पंतप्रधानपदाचा दर्जा कमी केला आहे, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com